अयोध्या – पृथ्वीवर लोकांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांना देवमाणूस मानलं जातं याचचं उदाहरण अयोध्येत पाहायला मिळालं आहे. याठिकाणी दोन डॉक्टरांनी रक्त देऊन एका अल्पवयीन मुलीचा जीव वाचवला आहे. गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी या मुलीला दाखल केले. रुग्णाला रक्ताची नितांत गरज होती. मुलीच्या आईचा रक्तगट न जुळल्याने दुसरीकडून रक्ताची जुळवाजुळव सुरू झाली. परंतु कुठेही रक्त उपलब्ध झालं नाही. अशावेळी इमरजेन्सी ड्युटीवर असणारे डॉक्टर्सनं पुढाकार घेतला. रुग्णाची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी स्वत: रक्तदान करण्याचा निर्णय घेतला.
काय आहे प्रकरण?
अयोध्या जिल्हा रुग्णालयात दोन चिकित्सक डॉ. आशिष पाठक आणि डॉ. अजय तिवारींनी कौतुकास्पद कार्य केले आहे. शहरातील देवकाळी भागात राहणारी १७ वर्षीय अंशिका यादव खूप दिवसांपासून आजारी होती. दोन दिवसापूर्वी अंशिकाची तब्येत अचानक बिघडली. तिच्या घरच्यांनी तात्काळ तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. रुग्णाची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला दाखल करून घेत २ यूनिट रक्ताची व्यवस्था करण्याचा सल्ला दिला.
अंशिकाची आई रक्तासाठी ब्लड बँकमध्ये पोहचली मात्र तिथे तिला रक्ताची पिशवी मिळाली नाही. रात्रभर अंशिकाचे नातेवाईक रक्तासाठी भटकत राहिले. वेळ निघून चालली होती. हळूहळू अंशिकाची तब्येत ढासळत होती. सकाळी जेव्हा इमरजेन्सी ड्यूटीवर तैनात असलेले डॉ. आशिष पाठक आणि अजय तिवारी यांनी अंशिकाची प्रकृती चिंताजनक होत असल्याचं पाहिलं. रुग्णाची अवस्था पाहून आरोग्य कर्मचारीही चिंतेत पडले. कुठल्याही परिस्थितीत अंशिकाचा जीव वाचवायचाच असं ठरवत आशिष आणि अजयनं स्वत: रक्तदान करण्याचा निर्णय घेतला.
आईनं मानले आभार अन् प्रमुख आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं डॉक्टरांचे कौतुक
योग्यवेळी अंशिकाचा रक्त मिळाल्याने तिचा जीव वाचला. डॉ. आशिष पाठक म्हणाले की, माझा सहकारी डॉ. अजय तिवारीसोबत रक्तदान करून आम्ही अंशिकासाठी २ यूनिट रक्ताची व्यवस्था केली. अंशिकाला रक्त दिल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. अंशिकाच्या आईनं दोन्ही डॉक्टरांचे आभार मानत त्यांनी माझ्या मुलीला रक्त दिल्याने तिच्या जीवाचा धोका टळला असं सांगितले. तर जिल्हा हॉस्पिटलचे प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ. सीबीएन त्रिपाठी यांनी डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत एका रुग्णाचा जीव वाचवल्याबद्दल डॉ. आशिष आणि डॉ. अजयच्या कार्याचं कौतुक केले.