ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - सम आणि विषम तारखेनुसार दिल्लीच्या रस्त्यावर एक दिवसाआड सम आणि विषम क्रमांकाच्या गाडयांना परवानगी देण्याच्या योजनेची राजधानी दिल्लीमध्ये आजपासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. मागच्या महिन्याभरापासून या सम आणि विषम फॉर्म्युला देशभरामध्ये चर्चा सुरु होती.
पहिल्यादिवशी या योजनेला दिल्लीकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. १ ते १५ जानेवारी दरम्यान सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सम-विषम फॉर्म्युल्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर या योजनेचे यश-अपयश पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल.
दिल्लीतील प्रदूषणाची पातळी धोकादायक स्तरापर्यंत पोहोचल्याने प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकार गाडयांसाठी सम-विषम फॉर्म्युला राबवत आहे. दिल्लीमध्ये मोठया संख्येने असलेल्या खासगी गाडया कमी झाल्या तर, प्रदूषण नियंत्रणात येईल असे दिल्ली सरकारचे मत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही योजना यशस्वी ठरल्याचा दावा केला असला तरी, विरोधकांनी मात्र त्यांना श्रेय देण्यास नकार दिला. नाताळची सुट्टी संपून शाळा सुरु होतील त्यावेळी खरे यश-अपयश समोर येईल असे विरोधकांनी सांगितले.
आज विषम तारीख असल्याने विषम क्रमांकाच्या गाडया रस्त्यावर आहेत. नियम मोडणा-या वाहनचालकाकडून दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल.