नवी दिल्ली- आम आदमी पक्षाच्या तिकीटावर संसदेत गेलेल्या धर्मवीर गांधी यांनी गांजाला कायदेशीर ठरविण्यासाठी खासगी विधेयक मांडले होते. हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. पतियाळा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे धर्मवीर गांधी हे स्वतः हृदयरोगतज्ज्ञ आहेत. गेली अनेक वर्षे ते गांजा कायदेशीर व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
2013 साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये आदित्य बरठाकूर यांनी गांजाला कायदेशीर ठरावा अशा आशयाची याचिका दाखल केली होती. भारतामध्ये अनेकदा काही संस्थांनी आणि व्यक्तींनी गांजाचे वैद्यकीय उपयोग दाखवत त्यासाठी प्रयत्न केले आहेत. यापूर्वी बिजू जनता दलाचे खासदार तथागत सत्पती आणि केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनीही गांजा कायदेशीर करण्याच्या बाजूने मत व्यक्त केले आहे.
भारतामध्ये गेली अनेक शतके गांजा विविध कारणांसाठी वापरला जातो. भारताच्या काही भागांमध्ये त्याला धार्मिक आणि सांस्कृतीक स्थानही देण्यात आले आहे. विशेषतः उत्तर भारतामध्ये त्याचा वापर धार्मिक कारणांखाली केला जातो. मात्र गांजाचा वापर कायदेशीर केल्यानंतर ते किती प्रमाणात व कोणी वापरायचे तसेच कोण्ताय कारणांसाठी वापरायचे याबाबत गोंधळ होण्याची शक्यता आहे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच गांजाच्या अतीवापरामुळे आणि त्याच्या सवयीमुळे वेडाचे झटके किंवा इतर मानसिक, शारीरिक त्रासही होऊ शकतात. तसेच ही गांजा ही एक स्टेपिंग स्टेप म्हणजे नशेच्या बाजारातले पहिले पाऊल ठरण्याची सर्वाधीक भीती असते. एकदा हे पाऊल पडलं की त्याच्या पुढची पावलं वेगाने पडायला लागतात आणि नशेच्या विळख्यात अधिकाधिक गुंतायला होते त्यामुळे गांजा भारतामध्ये कायदेशीर ठरणे धोकादायक असल्याचे तज्ज्ञांना वाटते. काही देशांमध्ये गांजाचा वापर कायदेशीर करण्यात आला आहे.