महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 05:18 AM2020-09-13T05:18:42+5:302020-09-13T05:19:00+5:30
सोनिया गांधी आपल्या आरोग्याशी संबंधित काही चाचण्यांसाठी अमेरिकेकडे रवाना होत असल्यामुळे पक्षातील बदलांना काही काळ विराम देण्यात आला आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्ष संघटनेत फेरबदल सुरू केले असून, उच्चपदस्थ सूत्रांनुसार, महाराष्टÑासह अन्य राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा सोनिया गांधी उपचारानंतर स्वदेशात परतल्यानंतर होण्याची शक्यता आहे.
सोनिया गांधी आपल्या आरोग्याशी संबंधित काही चाचण्यांसाठी अमेरिकेकडे रवाना होत असल्यामुळे पक्षातील बदलांना काही काळ विराम देण्यात आला आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांना बदलून त्यांच्या जागी मल्लिकार्जुन खरगे यांची नेमणूक करण्यावर विचारमंथन सुरू आहे. तथापि, राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांचेही नाव चर्चेत आहे; परंतु खरगे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्याबाबत सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याकडून विचार होऊ शकतो, असे उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे.
याबरोबरच अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार असून, त्याबाबत तयारी सुरू आहे. सोनिया गांधी स्वदेशात परतल्यानंतर संपूर्ण चित्र त्यांच्यासमोर मांडण्यात येईल व त्या तात्काळ निर्णय घेऊ
शकतील.
राहुल गांधी समर्थकांना मिळाले स्थान
- सोनिया गांधी जी टीम तयार करीत आहेत त्याला राहुल गांधी यांची सहमतीही प्राप्त आहे. शुक्रवारी जे फेरबदल करण्यात आले, त्यांची घोषणा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या चर्चेनंतर झाली. त्यामुळे या फेरबदलात राहुल गांधी समर्थक युवा नेत्यांना मोठ्या प्रमाणावर स्थान मिळाले आहे.
- रणदीप सुरजेवाला, जितीन प्रसाद, माणिक टागोर, गौरव गोगोई, जितेंद्र सिंह, राजीव शुक्ल, विवेक बन्सल, मनीष चतरथ ही नावे त्यात समाविष्ट आहेत.