- जयशंकर गुप्त, नवी दिल्लीसंसदेतील कोंडी आज शुक्रवारी आणि त्यानंतर पुढच्या आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. ललित मोदी प्रकरण आणि व्यापमं घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी गेल्या २१ जुलैपासून संसदेचे कामकाज ठप्प पाडलेले आहे. संसदेतील कामकाज सुरळीत चालावे म्हणून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती; पण कोंडी न फुटल्याने ही बैठक निष्फळ ठरली.संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालविण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकारनेच कोंडी निर्माण झाल्याची कारणे दूर करून कामकाज सुरळीत करण्याचे सुनिश्चित केले पाहिजे, असे लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. स्वराज, राजे आणि चौहान यांनी राजीनामा देईपर्यंत संसदेचे कामकाज ठप्प पाडण्याच्या आपल्या भूमिकेवर काँग्रेस आणि विरोधी पक्ष कायम आहेत, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, गुरुवारी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि अन्य दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर लोकसभेत कामकाज दिवसभरासाठी, तर राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे संकेतसुषमा स्वराज यांच्यासह भाजप नेत्यांच्या राजीनाम्याच्या विरोधकांच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची आपली तयारी असल्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.