नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आयोगाने शिफारस केलेले मूळ वेतन (बेसिक पे) दुप्पट मिळण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाने मूळ वेतनाची जी शिफारस केली आहे ती सचिवांची अधिकार समिती दुप्पट करण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची प्रक्रिया सध्या ही समिती करीतआहे. मिळालेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात ३० टक्के वाढीची अपेक्षा करता येऊ शकेल. एक जानेवारी २०१६ पासून आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी होणार आहे. आयोगाच्या शिफारशींचा आढावा गतीने घेण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना दिला होता. तसे झाल्यास त्यांची अंमलबजावणी वेगाने करता येणार आहे. सचिवांच्या समितीने कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त लाभ द्यावा, असे मोदी यांनी समितीला सांगितले आहे.शिफारशींचा लाभ ४७ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि ५२ लाख केंद्रीय सेवानिवृत्तीधारकांना होणार आहे.सातव्या वेतन आयोगाने वेतन आणि भत्त्यांमध्ये २३.५५ टक्के वाढीची शिफारस केली आहे. वेतन १६, भत्ते ६३ आणि पेन्शन २४ टक्क्यांनी वाढेल.सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींबद्दल लष्कर, नौदल आणि हवाई दलाने व्यक्त केलेल्या शंकांचे नव्याने विश्लेषण करावे, असे नुकतेच संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते. सशस्त्र दलांनी जी भूमिका घेतली तिचा आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास सरकारने केला असून, व्यक्त झालेली काळजी नजीकच्या भविष्यात दूर केली जाईल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन दुप्पट होण्याची शक्यता
By admin | Published: February 13, 2016 3:39 AM