जयशंकर गुप्त, नवी दिल्लीमहाराष्ट्रातील सहा शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प चालविले जात आहेत. पुणे नगर परिषदेने प्रत्येकी पाच टन क्षमतेचे १८ बायोगॅस प्रकल्प उभारलेले आहेत. त्यामध्ये उत्पादित विजेचा पुरवठा रस्त्यावर प्रकाश व्यवस्था करण्यासाठीही करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय शहर विकासमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी राज्यसभेत खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.महाराष्ट्राच्या अलिबाग (जि. रायगड), चिपळूण (खेड), दापोली (रत्नागिरी), कळमेश्वर (नागपूर) या नगर परिषदा बायो मेथॉनेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घनकचऱ्यापासून वीज उत्पादन घेत आहेत, असे नायडू यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेने ३० वर्षांसाठी डीओबीटीच्या आधारावर तापद्वारा वायूकरण संबंधी तंत्रज्ञानावर आधारित कचऱ्यापासून ऊर्जा प्रकल्प स्थापन केलेला आहे, असे नायडू म्हणाले.‘कचऱ्यापासून ऊर्जा’ वर २०१४मध्ये प्रकाशित झालेल्या योजना आयोगाच्या कृती दलाच्या अहवालाचा संदर्भ देताना नायडू म्हणाले, भारतात प्रतिदिन निघणारा ३२८९० टन कचरा रिफ्युज्ड डिराईव्ह फ्युएल (कचऱ्यापासून निर्माण होणारी वीज) निर्माण करू शकतो. हे इंधन सध्या भस्मीकरण, वायुकरण किंवा ताप तंत्रज्ञानावर आधारित पुढच्या पाच-सात वर्षांप्मध्ये पाच मेगावॅट क्षमतेचे ८८ विद्युत प्रकल्प चालविण्यास सहायक ठरू शकतात. २०३१ पर्यंत याप्रकारच्या कचऱ्यापासून चालणाऱ्या वीज प्रकल्पांची संख्या २१५ आणि सन २०५० पर्यंत २७८० मेगावॅट वीज निर्मिती करणाऱ्या ५५६ वीज प्रकल्पांपर्यंत पोहोचू शकते, अशी माहितीही त्यांनी दिली़देशात नगरपालिकेच्या ठोस कचऱ्यापासून वीज उत्पादनाच्या शक्यता आहेत का? तसेच महाराष्ट्र आणि अन्य ठिकाणी नगर परिषदांच्या ठोस कचऱ्यापासून वीज उत्पादन करण्याच्या दिशेने सरकारने काय पावले उचलली, असे प्रश्न खा़ दर्डा यांनी विचारले होते़
नगर परिषदेच्या घनकचऱ्यातून वीजनिर्मितीची शक्यता
By admin | Published: December 19, 2014 4:26 AM