ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - भारतात आणीबाणीला(इमर्जन्सी) ४० वर्ष होऊन गेली असली तरी देशात पुन्हा आणीबाणी लागू होऊ शकते. सध्या संविधान व कायद्याचे कवच असूनही लोकशाहीला चिरडणे सहज शक्य असल्याची भीती लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केली आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे मार्गदर्शक लालकृष्ण आडवाणी यांनी गुरुवारी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. देशात इंदिरा गांधी सरकारने लादलेल्या आणीबाणीला यावर्षी ४० वर्ष होत असून यानिमित्त लालकृष्ण आडवाणींनी देशातील सद्य राजकीय स्थितीवर परखड मतं मांडली आहेत. १९७५ - ७७ या आणीबाणीच्या काळानंतरही देशात पुन्हा नागरिकांच्या स्वातंत्र्यांवर गदा येणार नाही असे नाही. या गोष्टी सहजपणे करणे शक्य नसले तरी अशा गोष्टी घडूच शकणार नाही असे नाही. नागरिकांचे मुलभूत हक्क पुन्हा हिरावून घेतले जाऊ शकतात असे आडवाणींनी म्हटले आहे.
पुन्हा आणीबाणी येईल असे का वाटते असा प्रश्न विचारला असता आडवाणी म्हणाले, आपल्या राजकीय व्यवस्थेत असे कोणतेही संकेत दिसत नाही की आपण निर्धास्त राहू, राजकीय नेतृत्वापासूनही कोणतेही चांगले संकेत मिळत नाही, सध्याचे राजकीय नेतृत्व परिपक्व नाही असा याचा अर्थ नाही, पण विद्यमान नेतृत्वांवर विश्वास ठेवता येत नाही असेही त्यांनी नमूद केले. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर असतानाच आडवाणींनी हे विधान करुन मोदींवर निशाणा साधल्याची चर्चा रंगली आहे.