जम्मू : सियाचीनमध्ये हिमकडे कोसळल्यानंतर एक दिवसापासून बर्फात बेपत्ता झालेले लष्कराचे १० जवान जिवंत असण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, या जवानांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी विशेषज्ञांचे पथक, श्वान आणि उपकरणांच्या मदतीने शोधमोहीम तीव्र करण्यात आली. हिमस्खलनामुळे लष्कराची एक चौकी बर्फाखाली दबली आहे. संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल एस. डी. गोस्वामी यांनी सांगितले की, बर्फ साफ करण्याचे काम अत्यंत अवघड असून चौकीपर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठे बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. येथील बर्फ काढण्यासाठी उपकरणांचा वापर केला जात आहे. बचाव पथक वाईट हवामान आणि प्रतिकूल वातावरणातही जवानांचा शोध घेत आहे; परंतु यांच्यापैकी कुणी जिवंत असण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. बुधवारी पहाटे लडाख क्षेत्रात उत्तरेकडील भागात १९ हजार फूट उंचावरील एक लष्करी चौकी हिमकडा कोसळल्याने बर्फाखाली आली.
बेपत्ता १0 जवान जिवंत असण्याची शक्यता कमी
By admin | Published: February 05, 2016 3:10 AM