ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12- ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या मत्यूवर पाकिस्तानी मीडियाचं वायफळ प्रसारण सुरूच आहे. पहिले पाकिस्तानी मीडियाने ओम पुरी यांच्या मृत्यूचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबरोबर संबंध जोडला होता.
आता पाकिस्तानी मीडियाने सलमान खान आणि फवाद खानच्या हत्येची शक्यता व्यक्त केली आहे. ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचा मृत्यू हृदय विकाराने झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली असा अजब शोध पाकिस्तानी मीडियाने लावला होता. ओम पुरी यांच्या मृत्यूनंतर सलमान खान आणि फवाद खानची हत्या होऊ शकते असं पाकिस्तानी मीडियाने म्हटलं आहे.
भाजपाच्या प्रवक्त्या शाइना एन.सी. यांनी या वृत्तांवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून पाक मीडियाने वृत्त देण्याआधी त्याची शहानिशा करावी असं त्या म्हणाल्या. तसेच ओम पुरी यांच्या हत्ये मागे राजकारण असल्याचं वृत्त त्यांनी पूर्णतः फेटाळलं. भारतात आम्ही स्वच्छ आणि निष्पक्ष मीडियावर विश्वास ठेवतो असं त्या म्हणाल्या.
ओम पुरी यांच्या मृत्यूमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा हात असल्याचा दावा पाकिस्तानच्या बोल टीव्हीच्या कार्यक्रमातून करण्यात आला होता. ओम पुरी हे पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करायचे म्हणून मोदी आणि डोवाल यांनी कट रचून त्यांची हत्या केली असा अजब आरोप बोल टीव्हीचा अँकर आमिर लियाकतने केला होता.
(वृत्तसंस्था-IANS)