हरीश गुप्ता, लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी सक्रिय आणि आक्रमक प्रचार केलेला नाही. त्यामुळे पक्षाच्या खासदारांमध्ये अस्वस्थता पसरली असून राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षाची कामगिरी खराब राहिल्यास बसपमध्ये फूट पडण्याची शक्यता काही सूत्रांनी वर्तविली आहे.
उत्तर प्रदेशात बसपाचे १० खासदार आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान रणनीती आखण्यासाठी मायावती त्यांना भेटलेल्या नाहीत. किंबहुना त्यांना केवळ दूरध्वनीद्वारे प्रचाराबाबत सूचना आणि जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. बसपचे लाेकसभेतील पक्षनेते रितेश पांडे यांचे वडील भाजपच्या तिकिटावर विधानसभा लढवीत आहेत. याकडे मायावती कसे दुर्लक्ष करू शकतात, असा प्रश्न सर्व खासदारांना पडला आहे. मायावती स्वत: सक्रिय प्रचारात उतरल्या नाहीत.
बसपच्या एका वरिष्ठ खासदाराने नाव उघड न करण्याच्या अटीवर ‘लाेकमत’ला सांगितले की, २०१७ मध्ये सक्रिय प्रचार न केल्यामुळे २२ टक्के मते मिळूनही केवळ १९ जागा जिंकता आल्या हाेत्या. यावेळी माेठा फटका बसू शकताे. त्याउलट २१.८ टक्के मते मिळूनही समाजवादी पार्टीने ४७ जागा जिंकल्या हाेत्या.
निर्णय घ्यावा लागणार
बसपच्या खासदारांना उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय मार्गाबाबत निर्णय घ्यावा लागणार असल्याचे चित्र आहे. कामगिरी खराब राहिल्यास पक्षात माेठी फूट पडू शकते, असे काही सूत्रांनी सांगितले.