वॉशिंग्टन- भारतात होऊ घातलेल्या 2019च्या लोकसभा निवडणुकीत रशिया हस्तक्षेप करण्याची शक्यता ऑक्सफर्ड तज्ज्ञांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे ऑक्सफर्ड तज्ज्ञांनी रशिया हस्तक्षेप करणार असल्याचा दावा अमेरिकी खासदारांसमोर केला आहे. भारत आणि ब्राझीलसारख्या देशांत येत्या काही महिन्यांत निवडणुका होणार आहेत. मीडियाच्या माध्यमातून रशिया या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करू शकते, असं ऑक्सफर्ड तज्ज्ञांचं मत आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी रशियानं अमेरिकेतल्या निवडणुकांमध्येही हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु त्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार खंडन केलं आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक फिलीप एन. होवर्ड यांनी ''सोशल मीडियावर विदेशी प्रभाव'' या मुद्द्यावर सिनेटच्या एका गुप्त बैठकीत हा खुलासा केला आहे. परंतु होवर्ड यांनी विस्तृत माहिती दिलेली नाही. निवडणुकीच्या काळात भारत आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये परिस्थिती गंभीर होऊ शकते. तिथे मीडिया हा अमेरिकेएवढा प्रभावी नाही. सिनेटर सुसान कोलिंस यांच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल होवर्ड यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यावेळी त्यांनी भारत आणि ब्राझीलमध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मीडियाच्या माध्यमातून रशिया हस्तक्षेप करू शकतो.जगभरात सर्वाधिक व्यावसायिक हा अमेरिकेचा मीडिया आहे. आमच्यासारख्या लोकशाही मानणा-या मित्र देशांमध्ये अनेक चिंता असू शकतात. रशियानं आम्हाला निशाणा बनवल्यानंतर आता ब्राझील आणि भारतासारख्या लोकशाही देशांना तो टार्गेट करत आहे. जिथे येत्या काही दिवसांत निवडणुका होणार आहेत. सिनेट कमिटीनं 2016मध्ये रशियानं अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये केलेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित केला आहे. एफबीआयनंही रशियानं अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचं स्पष्ट केलं होतं.
मीडियाच्या माध्यमातून भारतातल्या निवडणुकीत रशिया हस्तक्षेप करण्याची शक्यता- ऑक्सफर्ड तज्ज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 9:46 PM