नवी दिल्ली - बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृतदेह भारतात आणण्याच्या प्रक्रियेला आणखी विलंब लागू शकतो. ह्दयविकाराच्या झटक्यामुळे नव्हे तर बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाल्याचे फॉरेन्सिक अहवालातून समोर आले आहे. एकूणच या प्रकरणाभोवती संशयाचे दाट धुके निर्माण झाल्यामुळे श्रीदेवी यांच्या मृतदेहाचे आणखी एकदा शवविच्छेदन होऊ शकते असे वृत्त नवभारत टाइम्सने दिले आहे.
दुबईतील तपासकर्ते श्रीदेवीच्या मृत्यूच्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दुबई पोलिसांकडून श्रीदेवीचे पती बोनी कपूर आणि हॉटेल स्टाफची चौकशी सुरु आहे. जुमैरा एमिरेट्स टॉवर या हॉटेलच्या रुम नंबर 2201 मध्ये शनिवारी रात्री श्रीदेवी बेशुद्धावस्थेत सापडल्या होत्या.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर मृतदेह भारतात नेण्याची परवानगी देण्यात येईल असे दुबई पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर या मृत्यूचा फेरतपास करण्याची गरज आम्हाला वाटली असे दुबई पोलिसांनी म्हटले आहे.
ज्या रात्री श्रीदेवी यांचा मृत्यू झाला तेव्हा बोनी कपूर यांनी मला फोन केला होता. मात्र, तेव्हा मोबाईल सायलंटवर असल्यामुळे मी त्यांचा फोन उचलला नाही. माझ्या मते त्यांनी सर्वात पहिला फोन मलाच केला असावा. मी मोबाईल उचलत नसल्यामुळे त्यांनी माझ्या घरच्या लँडलाईनवर फोन केला. तो फोन उचलल्यानंतर बोनी कपूर यांनी मला श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दल सांगितले. परंतु परिस्थितीच अशी होती की, आम्ही पुढे फार काही बोलू शकलो नाही, असे अमरसिंह यांनी म्हटले.
अमरसिंह हेदेखील मोहित मारवाह यांच्या विवाह सोहळ्याला दुबईत गेले होते. मात्र, लखनऊतील एका कार्यक्रमात हजेरी लावायची असल्याने हे दोघेही भारतात परतले होते. त्यामुळे श्रीदेवी दुबईत एकट्याच होत्या. मात्र, आता असे वाटतेय की, आम्ही तिकडे थांबलो असतो तर ही घटना टळू शकली असती.