ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25 - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत होणा-या कार्यक्रमावर लष्कर- ए- तोयबा ही दहशतवादी संघटना हवाई हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. हवाई हल्ला होण्याच्या भीतीमुळे दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी चार्टर हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं संचलनादरम्यान हल्ला करू शकतात, अशी माहिती गुप्तचर विभागानं सुरक्षा यंत्रणांना दिली आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना अफगाणिस्तानच्या आयडीचा वापर करून भारतात येऊन हवाई हल्ले करू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलिसांनी सतर्कतेच्या कारणास्तव अँटी ड्रोन टेक्नॉलॉजी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनेक इंच इमारतींवर विमानरोधक गनसह जवानांना तैनात करण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणांच्या इशा-यानंतर राजपथावर सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यात आली असून, दहशतवादी जवानांच्या पेहरावातही हल्ला करण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कर्मचा-यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता
By admin | Published: January 25, 2017 10:14 PM