कोलकाता : पश्चिम बंगालचे मंत्री जाकीर हुसेन यांच्यावर हल्ला करण्यासाठी आयईडीचा वापर केला असल्याची शक्यता सीआयडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. श्रममंत्री हुसेन हे मुर्शिदाबाद जिल्ह्यातील निमतिता रेल्वेस्थानकावर बुधवारी रात्री झालेल्या स्फोटात जखमी झाले होते.एसटीएफ व फॉरेन्सिक टीमच्या सदस्यांसह सीआयडी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा घटनास्थळाला भेट दिली व नमुने गोळा केले. त्यानंतर तपास संस्थेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, निमतिता स्थानकावरील स्फोटात आयईडीचा वापर केल्याची शक्यता बळावली आहे. घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर लोखंडाची सळई व दुचाकी वाहनांत वापरली जाणारी बॅटरी तसेच इलेक्ट्रिक सर्किट आढळले आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळाले असून, त्याची आम्हाला तपासात मदत होणार आहे.अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचे क्षण एका व्हिडिओमध्ये कैद झाले आहेत. ते फॉरेन्सिक तपासासाठी पाठविले आहेत. त्यात मंत्र्याचा एक सहयोगी काही तरी हटविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ते नेमके काय आहे, हे शोधले जात आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, घटनेच्या वेळी तेथे हजर असलेल्या लोकांशीही चर्चा करण्यात आली आहे. लोकांचे म्हणणे आहे की, एका बॅगमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. ती बॅग हटविण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना स्फोट झाला. बॅगचे काही अवशेष मिळाले आहेत. या घटनेनंतर राज्य सरकारने संबंधित मंत्र्याला झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, हुसेन यांनी आपल्या पक्षात प्रवेश करावा, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. हा हल्ला म्हणजे त्याचाच एक भाग आहे, असा आरोप राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.या हल्ल्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करावी, असे राज्यपाल जगदीप धनखड यांनी म्हटले आहे.जंगीपूर विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे आमदार असलेले जाकीर हुसेन हे स्फोटात जखमी झाले होते. त्यांना गुरुवारी येथील एसएसकेएम रुग्णालयात आणण्यात आले होते. सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची तब्येत स्थिर आहे. स्फोटात त्यांच्याबरोबर जखमी झालेल्या व रुग्णालयात भरती झालेल्या इतर १३ जणांची प्रकृतीही स्थिर आहे.
मंत्र्यावरील हल्ल्यात आयईडीच्या वापराची शक्यता, घटनास्थळाजवळ लोखंडाची सळई व दुचाकी वाहनांची बॅटरी आढळली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 1:17 AM