एस.पी. सिन्हा -
पाटणा : बिहारमध्ये सारण लोकसभा मतदारसंघात सोमवारी छपरा येथे लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांच्यावर मतदान केंद्र ताब्यात घेतल्याचा आरोप झाला आणि मोठा गदारोळ झाला. यानंतर, मंगळवारी सकाळी झालेल्या अंदाधुंद गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन गंभीर जखमींपैकी एकाचा पाटणा पीएमसीएचमध्ये मृत्यू झाला. तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे.
चंदन राय आणि गुड्डू राय अशी मृतांची नावे असून मनोज राय यांची प्रकृती चिंताजनक आहे. या गदारोळानंतर जिल्ह्यात दोन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे. मुफसिल पोलिस ठाण्याच्या तेलपा भिकारी चौकाजवळ ही घटना घडली.
सोमवारी मतदानाच्या दरम्यान दोन गटांत हाणामारी झाली होती. एका बाजूला रोहिणी आचार्य तर दुसरीकडे भाजपकडून रमाकांत सिंह सोळंकी या गटांचे नेतृत्व करीत होते. त्यानंतर, आरजेडी कार्यकर्ते आणि स्थानिक लोकांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाली.
भाजप निराश आहे. पराभवाच्या भीतीने हिंसाचार झाला आहे. आरजेडीच्या कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या. हे सहन करणार नाही. सोमवारी मतदानाच्या वेळी उमेदवार म्हणून केंद्रावर फिरत असताना भाजपच्या लोकांनी आपल्याला अश्लील शिवीगाळ केली. तेथे भाजपचा निषेध केल्यामुळे मंगळवारी सकाळी तीन आरजेडी कार्यकर्त्यांवर भाजपच्या लोकांनी गोळ्या झाडल्या. - रोहिणी आचार्य, आरजेडी उमेदवार.
आमची प्रशासनाशी चर्चा झाली आहे. त्यांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले असून दोघांना अटकही करण्यात आली आहे. निवडणुकीत अशा गोष्टींना थारा नाही. प्रशासनातील लोकांनी याकडे लक्ष द्यावे. याचा हिशेब जनता करत आहे.- तेजस्वी यादव, विरोधी पक्षनेते, आरजेडी.