भोपाळ: ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसचं अध्यक्षपद द्या, असे बॅनर मध्य प्रदेशात झळकले आहेत. शिंदे यांच्याकडे काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा सोपवण्याचं आवाहन बॅनरच्या माध्यमातून राहुल गांधींकडे करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसचं अध्यक्षपद रिक्त आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)मध्य प्रदेशचे वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पक्षाचं अध्यक्षपद देण्यात यावं, असं आवाहन राहुल गांधींकडे करण्यात आलं आहे. मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचा उल्लेख या बॅनरवर आहे. भोपाळमधील प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या बाहेर हा बॅनर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे कालच शिंदे यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा देत असल्याचं शिंदे यांनी म्हटलं. 'लोकसभा निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल मान्य करून त्याची जबाबदारी मी स्वीकारत असून, मी माझ्याकडे असलेल्या पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द करत आहे. माझ्याकडे हा पदभार सोपवून पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,' असं शिंदे यांनी राजीनामा देताना सांगितलं.2014 मध्ये मोदी लाट असूनही निवडून आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचा यंदाच्या निवडणुकीत पराभव झाला. गुना लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या कृष्णपाल सिंह यांनी शिंदे यांना सव्वा लाख मतांनी पराभूत केलं. सिंधिया यांच्याकडे पक्षानं उत्तर प्रदेशच्या पश्चिम विभागाची जबाबदारी सोपवली होती. मात्र त्यांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.