पाटणा : भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील एनडीए सरकारला आव्हान देण्यासाठी देशभरातील विरोधकांनी एकत्रित येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीच्या पाटणा, बंगळुरू आणि मुंबई येथे बैठका पार पडल्यानंतर आज चौथी बैठक नवी दिल्ली येथे होत आहे. राजधानी दिल्लीतील या बैठकीत जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र या बैठकीआधी बिहारची राजधानी असलेल्या पाटणा इथं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समर्थकांनी लावलेल्या पोस्टर्सची चर्चा होऊ लागली आहे.
पाटण्यात लावलेल्या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे की, "जर खरंच विजय हवा असेल तर एक निश्चय पाहिजे, एक नितीश पाहिजे." या पोस्टरच्या माध्यातून नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचा चेहरा घोषित करण्याची मागणी होऊ लागल्याचं बोललं जात आहे. इंडिया आघाडीच्या आतापर्यंत पार पडलेल्या बैठकांमध्ये नेतृत्व कोणी करावं, याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. असं असताना नितीश कुमार समर्थकांकडून अशा प्रकारचे पोस्टर झळकवले जाऊ लागल्याने आजच्या बैठकीत या आघाडीचा चेहरा ठरवण्याबाबत काही खलबतं होतात का, हे पाहावं लागेल.
दरम्यान, नितीश कुमार यांच्या पुढाकारानेच विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर बंगळुरू येथील दुसऱ्या बैठकीत या आघाडीचं इंडिया असं नामकरण करण्यात आलं. तसंच नंतर प्रचारयंत्रणेसह विविध समित्यांची स्थापना करत त्यावर सदस्यांची नेमणूक करण्यात आली. मात्र लोकसभा निवडणुकीला काही महिने बाकी असताना अद्याप या आघाडीच्या जागावाटपावर चर्चा झालेली नाही.
आज कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते?
इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत जागावाटपासह संयुक्त निवडणूक कॅम्पेनची घोषणा होऊ शकते. तसंच सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी कॉमन अजेंड्यावर चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेऊ शकतो.