नवी दिल्ली: राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेला काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबतचा संभ्रम सोमवारी सोनिया गांधींच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींचे लागलेले पोस्टर्स हटवून सोनिया गांधी यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहे.
तसेच सोनिया गांधींची हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस मुख्यालयात सोनिया गांधींचे बॅनर, पोस्टर्स लावण्यात आले आहे. तसेच मुख्यालयात ज्या रुममध्ये काँग्रेसचे अध्यक्ष बसतात त्या रुमच्या बाहेरील राहुल गांधीचे नाव बदलून सोनिया गांधींचे नाव लावण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच गांधी कुटुंबातील कुठलीही व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तेव्हापासून काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्षाचा शोध सुरू होता. मात्र सोमवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीची बैठकीत अध्यक्षपदासाठी कुठल्याही नेत्याच्या नावावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे अखेरीस सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली.