नवी दिल्ली - बिहारच्या राजकारणातील पोस्टर वॉर थांबण्याचं नाव घेत नाहीये. शुक्रवारी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याविरुद्धचे बॅनर आणि पोस्टर बिहारमध्ये झळकले. या बॅनरमध्ये लालू यांना करप्शन मेल म्हणून दाखवण्यात आले आहे. त्याआधी राजदकडून बिहार सरकारवर टीका करणारे बॅनर लावण्यात आले होते.
बॅनरमध्ये रेल्वेचा डब्बा दाखवण्यात आला असून त्यात लालू यांचा फोटो लावण्यात आला आहे. ज्यावर 'करप्शन मेल' लिहिण्यात आले आहे. तसेच रेल्वे पटना ते होटवारा असल्याचं सूचित कऱण्यात आले आहे. तसेच करप्शन एक्सप्रेस आणि स्वार्थी असा उल्लेख केला आहे. बॅनरवर लालू यांच्या हातात एक पुस्तक दाखवण्यात आले असून त्याला अपराध गाथा नाव देण्यात आले आहे. यावर हिंसा, चारा घोटाळा आणि महापुराचे चित्र दाखवण्यात आले आहे.
याआधी गुरुवारी राजदने बिहार सरकारवर बॅनरच्या माध्यमातून निशाना साधला होता. या पोस्टरमध्ये बिहारमधील एनडीए सरकारला डबल इंजिन दाखवले होते. बिहारमध्ये एनडीए सरकारला डबल इंजिन म्हणून संबोधले जाते. तसेच इंजिनवर एका बाजुला मुख्यमंत्री नितीश कुमार तर दुसऱ्या बाजुला उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी दाखविण्यात आले होते.