नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी भित्तीपत्रके चिकटवल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी शंभर जणांना अटक केली. त्यात ई-रिक्षाचालक (३०), शाळा सोडलेला तरुण (१९), लाकडी चौकटी बनवणाऱ्याचा (६१) समावेश आहे.
विशेष शाखेने दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांना भित्तीपत्रकाबद्दल कळवल्यानंतर १२ मे रोजी दिल्लीत लोकांना अटक करण्यात आली. पोस्टर्सवर असा मजकूर लिहिला होता : “मोदी जी हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?” पोलिसांनी ज्यांंना अटक केली ते एक तर रोजंदारीवरील मजूर आहेत किंवा बेरोजगार युवक. हे मजूर आणि बेरोजगार युवकांनी ही भित्तीपत्रके चिकटवली, फलक लावले. ही भित्तीपत्रके किंवा फलकांवरील मजकुराबद्दल किंवा त्यात गुंतलेल्या राजकारणाची त्यांना काहीही कल्पना नव्हती.
आरोपी काय म्हणाला?अटक झालेला राहुल त्यागी म्हणाला की, “आम आदमी पक्षाचे नगरसेवक धीरेंद्र कुमार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने मला २० फलक ११ मे रोजी दिले व कल्याणपुरीत ते लावण्यासाठी ६०० रुपये देण्याचे आश्वासन दिले.” धीरेंद्र कुमार यांनी हा आरोप नाकारला व मी फक्त लोकांची कामे करतो, असे म्हटले. ‘आप’ने या आरोपाला उत्तर दिले नाही. परंतु, ट्विटरवर म्हटले की, “मोदी जी हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?”
राहुल गांधी यांनी दिले आव्हान; मलाही अटक करा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीदेखील तेच पोस्टर शेअर केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मलादेखील अटक करा. यासोबत राहुल गांधी यांनी त्या पोस्टरचा फोटोदेखील शेअर केला आहे आणि विचारले आहे की, मोदीजी, आपण आमच्या मुलांच्या लसी विदेशात का पाठविल्या. त्यांनी हेच पोस्टर आता प्रोफाईल फोटो म्हणून ठेवले आहे.
सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, पोस्टरच्या माध्यमातून विरोध करणे गुन्हा असेल तर आम्ही हा गुन्हा पुन्हा पुन्हा करु. प्रियांका गांधी यांनीदेखील हेच पोस्टर प्रोफाईल फोटो म्हणून ठेवले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनीही या मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पक्षाचे संसद सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी आपल्या घराबाहेर एक पोस्टर लावत विचारले की, लसीप्रमाणेच पंतप्रधान कोठे गायब आहेत. राजद, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, डीएमके यांच्यासह अनेक राजकीय पक्ष ही मोहीम वेगवान करत आहेत. जेणेकरून लसीसाठी केंद्र सरकारवर दबाव येईल.