मध्य प्रदेशात 'धीरेंद्र शास्त्री मुर्दाबाद'चे पोस्टर; FIR दाखल करण्याची मागणी, काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 01:23 PM2023-05-21T13:23:49+5:302023-05-21T13:24:20+5:30
Protest Against Dhirendra Krishna Shastri : मध्य प्रदेशात धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली.
Dhirendra Krishna Shastri News : बागेश्वर धाम येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी साई बाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. मध्य प्रदेशातील कलचुरी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या सहस्त्रबाहू महाराज यांच्याबद्दल देखील शास्त्री यांनी एक आक्षेपार्ह विधान केले होते. ज्यावरून अद्याप वाद सुरूच असल्याचे दिसते. धीरेंद्र शास्त्री यांनी सहस्त्रबाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे हैहयवंशी कलचुरी समाजाकडून शास्त्री यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली.
दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या वक्तव्यानंतर दिलगिरी देखील व्यक्त केली होती. पण हैहयवंशी समाज यावर समाधानी नसल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच राजधानी भोपाळ येथे या समाजाने शास्त्री यांना विरोध दर्शवला होता. पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या अटकेचे पोस्टर अनेक वाहनांवर लावण्यात आले होते. दुसरीकडे, हैहयवंशी समाज मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या भेटीवर ठाम आहे. शास्त्री यांनी खेद व्यक्त केला असला तरी त्यांनी स्वत:च्या इच्छेनुसार भाष्य केले नाही, असे शास्त्रात लिहिले आहे, असा त्यांनी दावा केल्याचा आरोप कलचुरी सेनेच्या अध्यक्षांनी केला आहे. याप्रकरणी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची भेट घेतली असून, त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले असल्याचे कलचुरी समाजाने स्पष्ट केले.
शास्त्री यांनी व्यक्त केला खेद
वाढता वाद पाहून धीरेंद्र शास्त्री यांनी महाराज सहस्त्रबाहू यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला होता, मात्र त्यांनी माफी मागितली नव्हती. "भगवान परशुराम आणि महाराज सहस्त्रबाहू अर्जुन यांच्यातील युद्धाबद्दल मी जे काही बोललो आहे ते आमच्या पवित्र हिंदू धर्मग्रंथात वर्णन केलेल्या आधारावर सांगितले आहे", असे शास्त्री यांनी म्हटले होते.
"कोणत्याही समाजाच्या किंवा वर्गाच्या भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता. आम्ही सनातनच्या एकतेच्या बाजूने नेहमीच उभे राहिलो आहोत. तरीही आमच्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही दिलगीर आहोत. आम्ही सर्व हिंदू एक आहोत आणि एकच राहतील. आमची एकता हीच आमची ताकद आहे", असे स्पष्टीकरण धीरेंद्र शास्त्री यांनी दिले होते.