बंगळुरू : भाजपाप्रणित एनडीए असो अथवा काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे आज काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची म्हणजेच यूपीएची बैठक होणार आहे. त्यात सुमारे २६ हून अधिक पक्ष सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी सुमारे ३० हून अधिक पक्षांना निमंत्रण देण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बंगळुरूमध्ये मंगळवारी २६ हून अधिक विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरू होणार आहे. दरम्यान, या बैठकीपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य करण्यात आले. बंगळुरूच्या रस्त्यांवर बॅनर आणि पोस्टर्स लावण्यात आले, ज्यात नितीश कुमार यांचा द अनस्टेबल पीएम कँडिडेट म्हणजेच 'अस्थिर पंतप्रधान उमेदवार' (Nitih Kumar) असा उल्लेख करण्यात आला.
यासोबतच बिहारमध्ये नुकत्याच कोसळलेल्या पुलाचाही पोस्टरमध्ये उल्लेख करण्यात आला असून पुलाचा फोटो सुद्धा लावण्यात आला आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य करणारी पोस्टर्स आणि बॅनर्स बंगळुरूमध्ये विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीपूर्वी चालुक्य सर्कल, विंडसर मनोर ब्रिज आणि हेब्बलजवळील एअरपोर्ट रोडवर लावण्यात आले होते. मात्र, नंतर पोलिसांनी हे बॅनर्स हटवले.
दरम्यान, आजच्या विरोधी पक्षाच्या बैठकीत पहिल्यांदाच यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी स्वत: उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षाच्या एकजुटीला सोनिया गांधी दिशा देतील. सोनिया गांधींच्या नेतृत्वात होणाऱ्या या महाबैठकीत अनेक शंकाचे निराकरण केले जाईल. दुसरीकडे शरद पवार-ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेते ज्यांना राहुल गांधींचे नेतृत्व मान्य नाही, ते सोनिया गांधींसोबत सहजपणे काम करू शकतात. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांसोबत सोनिया गांधींचे सलोख्याचे संबंध आहेत. २०२४ ची लढाई किती तगडी होईल जे बंगळुरूत जमा झालेल्या विरोधी पक्षाच्या एकजुटीवरून दिसते.