नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढाईला बळकटी मिळावी, यासाठी आता वैद्यकीय शाखेच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांच्या सेवा घेण्यात येणार असून, वैद्यकीयच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेलाही चार महिन्यांची स्थगिती देण्यात आली आहे. तसेच नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या परिचारिकांचीही मदत घेण्यात येईल.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात रौद्ररूप धारण केले असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या ३० लाखांच्याही पुढे गेली आहे. मृत्यूदरही सातत्याने वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयातर्फे सोमवारी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर पदवीची प्रवेश परीक्षा चार महिने पुढे ढकलून एमबीबीएसच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांची कोरोनाकालीन सेवानियुक्ती करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. जे विद्यार्थी १०० दिवसांची सेवा पूर्ण करतील, त्यांना नजीकच्या भविष्यात घेतल्या जाणाऱ्या सरकारी वैद्यकीय सेवांमध्ये प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे. तसेच त्यांचा कोविड राष्ट्रीय सन्मानाने गौरव होणार आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग टेलिकन्सल्टेशनसाठी तसेच कोविड स्थितीचे निरीक्षण करण्यासाठीही केला जाणार आहे.
त्यासाठी त्यांना प्राथमिक प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणार्थी असलेल्या परिचारिकांची मदतही घेतली जाणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
रिक्त पदांची ४५ दिवसांत भरती
वैद्यकीय तज्ज्ञ, परिचारिका तसेच वैद्यक क्षेत्रातील अनेक महत्त्वाची पदे रिक्त असून, राष्ट्रीय आरोग्य मिशनद्वारा येत्या ४५ दिवसांत ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. राज्यांनाही त्यांच्याकडील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना प्राधान्य देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोनाकाळात राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत अतिरिक्त २२०६ वैद्यकीय तज्ज्ञ, ४६८५ वैद्यकीय अधिकारी आणि २५,५९३ परिचारिकांची भरती करण्यात आल्याचे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. ........