ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोस्टमास्तर तब्बल ५० लाख रुपयांचा गैरवापर करुन फरार झाला आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. कुआनालो येथील पोस्ट ऑफिसचा पोस्टमास्तर कोडानाधारा बोईताई याने ५० हून अधिक लोकांच्या बचत खात्यातून तब्बल ५० लाख रुपये काढले आणि २३ ऑक्टोबरपासून तो फरार आहे.
पैसे परत मिळावेत या मागणीसाठी सोमवारी लोकांनी जाजपूर शहरातील सहायक पोस्ट ऑफिस अधीक्षकांना घेराव घातला. ही संपूर्ण फसवणूक तेव्हा उघडकीस आली जेव्हा सबितरानी दास नावाची महिला कुआनालो पोस्ट ऑफिसमध्ये तिच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी आली होती.
सबितरानी दास यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये पासबुकमध्ये एन्ट्री करायची आहे असं सांगून माझ्यासह अनेक लोकांचं पासबुक पोस्टमास्तरने त्याच्याकडे ठेवून घेतलं. तेव्हापासून पासबुक त्याच्याकडे आहे. मी माझ्या खात्यातून पैसे काढण्यासाठी गेली असता त्याने मला नंतर येण्यास सांगितलं. व्याज मोजण्यासाठी सर्व पासबुक जाजपूर मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पाठवण्यात आले असल्याचं सांगितलं.
जाजपूर पोस्टल विभागाचे सहाय्यक अधीक्षक हरिशंकर सुबुद्धी यांनी सांगितलं की, पोस्टमास्तरने गेल्या काही महिन्यांत जमा केलेले पैसे काढले आहेत. गेल्या महिन्यात आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. या घटनेची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.