संतोष ठाकूर
नवी दिल्ली : टपाल विभागाची पोस्टल पेमेंट बँक १ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये या बँकेचा प्रारंभ एका क्लिकने करतील व त्याचवेळी देशातील ६५० जिल्ह्यांत पेमेंट बँक सुरू होईल. ६५० जिल्ह्यांत या कार्यक्रमाच्या वेळी स्थानिक खासदार, आमदार व भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. या सगळ्या ठिकाणी मोदी यांचे भाषण टेलिकॉन्फरसिंगच्या माध्यमातून दाखविले जाईल.
या उपक्रमाबाबत दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले की, पेमेंट बँक व्यवस्थित चालण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आधी मंजूर केलेल्या ८०० कोटी रुपयांशिवाय बुधवारी अतिरिक्त ६३५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. व्यवसाय करता करता येत्या तीन वर्षांत ही पेमेंट बँक ना नफा ना तोटा या टप्प्यापर्यंत पोहोचेल. त्यानंतर बँक नफा मिळवू लागेल, याची आम्हाला खात्री आहे. ही बँक आपल्या खातेदारांना चार टक्के दराने व्याज देणार आहे. सिन्हा म्हणाले, बँक डिजिटल असेल. आधार क्रमांकाने तिच्यात खाते सुरू करता येईल. कागदाचा वापर शून्य असेल. पोस्टल पेमेंट बँक पैसे घरी नेऊन देणारी पहिलीच बँकदेखील बनेल. यासाठी देशातील ४० हजार नियमित व २.४० लाख ग्रामीण टपालसेवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. हे पोस्टमन चालती-फिरती बँक बनतील ते घरी जाऊन हँडहेल्ड मशीनच्या मदतीने खाते सुरू करतील, पैसे जमा करतील व रोख पैसेही देतील. यासाठी नाममात्र कमिशन ते घेतील. टपाल विभागाचे १७ कोटी बचत खातेधारक असून त्यांनाही या बँकेशी जोडण्याचे कार्य केले जाईल.प्रत्येक पोस्टात बँकेचा अॅक्सेस पॉइंटच्या बँकेची एक खिडकी (अॅक्सेस पॉइंट) देशातील सगळ्या १.५ लाख टपाल कार्यालयांत डिसेंबरपर्यंत सुरू केली जाईल. पेमेंट बँक कर्ज आणि विमा सेवा देऊ शकत नाही म्हणून पंजाब नॅशनल बँक आणि बजाज एलायंजशी यासाठी करार केला गेला आहे.च्केंद्रीय मंत्रिमंडळाने यातून मिळणाऱ्या कमिशनमधून २५ टक्के पोस्टमन-ग्रामीण टपाल सेवकांना व ५ टक्के रक्कम टपाल कार्यालयाला देण्यास बुधवारी मंजुरी दिली, असे सिन्हा म्हणाले.