श्रीनगर - तब्बल ७० दिवसांच्या खंडानंतर आजपासून काश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोबाइल फोन खणाणू लागले आहेत. पोस्टपेड मोबाईल सेवेवरील निर्बंध हटवण्यात आल्यानंतर सोमवारी दुपारपासून खोऱ्यातील सुमारे ४० लाख हून अधिक फोन सुरू झाले आहेत. वास्तविक काश्मीर खोऱ्यामधील मोबाईल सेवा शनिवारीच पूर्ववत करण्यात येणार होती. मात्र शेवटच्या क्षणी निर्माण झालेल्या तांत्रिक अडथळ्यांमुळे हा निर्णय लांबणीवर टाकावा लागला होता.
कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यातीलच मोबाईल सेवा बंद करण्यात आली होती होती. जम्मू आणि लडाख या भागात मोबाईल सेवा सुरू होती. दरम्यान, काश्मीर खोरे पर्यटकांसाठी खुले करण्याचे निर्देश केंद्र सरकारने नुकतेच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.