कोरोना व्हायरस आणि ओमायक्रॉन बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, उत्तर प्रदेशात रॅलींवर बंदी घालायला हवी अशी सूचना केली आहे. याच बरोबर सरकारने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाही काही काळ पुढे ढकलण्यासंदर्भात विचार करावा, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करत, अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. खरे तर, न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या एकल खंडपीठात जामीन अर्जांवर सुनावणी सुरू होती. यादरम्यान कोर्टातील गर्दी पाहून पंतप्रधान मोदींना, असे आवाहन करण्यात आले आहे.
'जान है, तो जहान है' - राज्यातील निवडणूक रॅली आणि सभां रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि निवडणूक आयुक्तांनी कठोर पावले उचलावीत, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. एवढेच नाही, तर राजकीय पक्षांना टीव्ही आणि वृत्तपत्रांच्या माध्यमाने प्रचार करावा, असे सांगायला हवे. पंतप्रधानांनीही निवडणुका पुढे ढकलण्याचा विचार करावा, कारण 'जान है, तो जहान है', असेही न्यायालयालयाने म्हटले आहे.
लसीकरण अभियानासाठी पंतप्रधान मोदींची प्रशंसा -न्यायालयाने कोरोना लसीकरण अभियानासाठी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली. पंतप्रधान मोदींनी भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात मोफत लसीकरण अभियान चालवले. हे कौतुकास्पद आहे. न्यायालय त्यांचे कौतुक करते. याच बरोबर, न्यायालय असेही आवाहन करते की, परिस्थिती पाहून, कठोर पावले उचलत रॅली, सभा आणि निवडणुका थांबवण्याचा आणि त्या पुढे ढकलण्याचा विचारही करण्यात यावा. कारण 'जान है, तो जहान है'.