नवी दिल्ली : मेट्रो कारशेडसाठी मुंबईच्या आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता डिसेंबर महिन्यात होईल असे न्या. अरुण मिश्रा व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सांगितले. आरे कॉलनीमध्ये मेट्रोची कारशेड बांधण्याच्या कामाला स्थगिती दिलेली नाही, मात्र तेथील झाडे तोडण्यास दिलेला स्थगिती आदेश कायम राहाणार आहे असे सर्वोच्च न्यायालयाने २१ आॅक्टोबर रोजी स्पष्ट केले होते. मेट्रो कारशेडच्या कामासाठी किती झाडे तोडली, किती नवी झाडे लावली आदी गोष्टींचा अहवाल सादर करावा असा आदेश मुंबई महानगरपालिकेला न्यायालयाने दिला होता. आरे कॉलनीमध्ये यापुढे एकही झाड तोडले जाणार नाही, तिथे जैसे थे स्थिती कायम राखण्यात येईल असे मुंबई महानगरपालिकेने न्यायालयाला सांगितले होते.आरे कॉलनीत झाडे तोडून मोकळ््या केलेल्या जमिनीचे, झाडांच्या पुर्नरोपणाचे, रोपट्यांची केलेली लागवड यांची छायाचित्रे सादर करावीत असे आदेश मुंबई मेट्रोलाही देण्यात आले होते. त्यावर ५ हजार झाडांचे पुर्नरोपण करण्यात आले असून आरे कॉलनीत जिथे झाडे तोडली, तिथे आता जैसे थे स्थिती राखण्यात येईल असे मुंबई मेट्रोने न्यायालयाला सांगितले होते.>अटक केलेल्यांची मुक्तता करामेट्रो कारशेड बांधण्यासाठी आरेमधील झाडे तोडण्यास पर्यावरणवाद्यांनी प्रचंड विरोध केला होता. त्यावेळी निदर्शने करणाऱ्यांपैकी अजूनही कोणी अटकेत असेल तर त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर त्वरित सुटका करण्यात यावी असेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.आरे कॉलनीतील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास दिलेली स्थगिती कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 5:26 AM