मेरठ : बहुचर्चित निठारी हत्याकांडप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या सुरेंद्र कोली याच्या फाशीला सर्वोच्च न्यायालयाने आठवड्याची स्थगिती दिली आहे.कोलीला मेरठ कारागृहात येत्या १२ सप्टेंबरला फासावर लटकविण्यात येणार होते. मात्र आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. एच.एल. दत्तू आणि ए.आर. दवे यांच्या खंडपीठाने त्याच्या फाशीस सात दिवसांची स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका अधिकार्याने सांगितले की, यासंदर्भात मध्यरात्रीनंतर एक अपील सर्वोच्च न्यायालयसमक्ष आले आणि मध्यरात्रीनंतर १ वाजून ४0 मिनिटाला त्यावर आदेश देण्यात आले. हा आदेश मेरठ कारागृह प्रशासनाकडे पोहोचला आहे. वरिष्ठ कारागृह अधीक्षक मोहम्मद हुसैन मुस्तफा रिझवी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा फाशीला स्थगिती देणारा आदेश पहाटे ४ वाजता आमच्यापर्यंत पोहोचला. यानंतर आदेशानुरूप कारवाई केली जाईल., असे मुस्तफा यांनी पत्रकारांना सांगितले.मेरठ कारागृहाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात कोलीच्या फाशीची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. त्याच्या कोठडीबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. फाशी सात दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे ऐकून कोलीने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पण त्याच्या चेहर्यावरचा तणाव कमी झालेला दिसला. (वृत्तसंस्था)
कोलीच्या फाशीस आठवडाभराची स्थगिती
By admin | Published: September 09, 2014 5:20 AM