नवी दिल्ली - राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी लांबणीवर गेली आहे. आता ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतरच होण्याची शक्यता आहे. उन्हाळी सुट्या २० मे पासून सुरू होऊन ३ जुलै रोजी संपणार आहेत.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. हिमा कोहली आणि न्या. जे. बी पारडीवाला यांच्या पीठासमोर हे प्रकरण प्रलंबित आहे. ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका राहुल रमेश वाघ व इतर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. राज्यातील २३ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या, २०७ नगरपालिका तसेच १३ नगरपंचायतीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना, आरक्षण तसेच मतदार यादीची कार्यवाही वाढीव सदस्य संख्येच्या आधारावर पूर्ण केली होती. मात्र ४ ऑगस्ट रोजीच्या अध्यादेशान्वये सदस्य संख्येत करण्यात आलेली वाढ व निवडणूक आयोगाने केलेली प्रभाग रचना आरक्षण तसेच मतदार यादीची कार्यवाही राज्य शासनाने रद्द केली. त्यामुळे निवडणुका प्रलंबित आहेत.