जगदलपूर (छत्तीसगड) : विरोधी पक्षांच्या जातीनिहाय गणनेच्या मागणीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विराेधी पक्षांवर घणाघाती टीका केली. ‘काँग्रेसला देशातील हिंदूंमध्ये कोणत्याही किमतीत फूट पाडण्याची आणि भारताचा नाश करण्याची इच्छा आहे,’ असा आरोप करून आपल्यासाठी गरीब ही सर्वात मोठी जात आहे आणि तीच सर्वात मोठी लोकसंख्या आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी देशाचा प्रमुख विरोधी पक्ष त्यांच्या नेत्यांऐवजी पडद्यामागील लोक देशविरोधी शक्तींशी संगनमत करून चालवत असल्याचा आरोपही केला. भाजपच्या परिवर्तन महासंकल्प सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, कालपासून काँग्रेसने वेगळा सूर लावला आहे. जेवढी लोकसंख्या, तेवढे अधिकार द्या, असे ते म्हणतात. मी म्हणतो की या देशात जर सर्वात जास्त लोकसंख्या असेल तर ती गरिबांची आहे. गरिबांचे कल्याण हे माझे ध्येय आहे.
मुख्यमंत्र्यांवर नाराजी
बस्तरच्या नागरनार पोलाद प्रकल्पाच्या उद्घाटनासह २६ हजार कोटींच्या प्रकल्पांच्या पायाभरणी आणि उद्घाटनाला मुख्यमंत्री, मंत्री उपस्थित न राहिल्याबद्दल मोदींनी नाराजी व्यक्त केली.
मोदींचा काँग्रेसला सवाल
“माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काय विचार करत असतील? ते म्हणायचे की देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे आणि त्यात मुस्लिमांचाही पहिला हक्क आहे. मात्र आता कोणाला किती अधिकार मिळणार हे लोकसंख्या ठरवेल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
काँग्रेसला मुस्लिमांचे अधिकार कमी करायचे आहेत का, अल्पसंख्याकांना हटवायचे आहे का? सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या हिंदूंनी आता पुढे येऊन आपले सर्व हक्क घ्यावेत का?” असा सवालही पंतप्रधानांनी केला.
तेलंगणात ८००० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन
पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी तेलंगणातील ऊर्जा, रेल्वे आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील सुमारे ८००० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. मनोहराबाद-सिद्धीपेठ रेल्वे मार्गाचे आणि धर्माबाद आणि मनोहराबाद दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे उद्घाटनही त्यांनी केले.