बंगळुरु : एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटकच्या जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारचा बुधवारचा शपथविधी सोहळा पुढील वर्षाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या विरोधातील सर्व पक्षांच्या महाआघाडीची मोट बांधण्यासाठी मांदियाळी ठरावी, यादृष्टीने जोरदार तयारी करण्यात येत आहे. शपथविधी सोहळा राजभवनात न करता राजवाडा मैदान किंवा क्रांतिवीर स्टेडियममध्ये करावा असा विचार होता. परंतु देशाच्या अनेक राज्यांमधून दोन डझनाहून अधिक पक्षांचे नेते येणे अपेक्षित असल्याने आता हा कार्यक्रम विधानसौधच्या (विधानसभा) प्रांगणात होेणार आहे. याची तयारी म्हणून काही पुरोहितांनी या जागी वास्तुशांतीही केली. कडाक्याचे ऊन लक्षात घेऊन त्याची वेळ सकाळऐवजी दुपारी ४.३० ची ठरविण्यात आली आहे.स्वत: कुमारस्वामी सरकार स्थापनेसंबंधी काँग्रेस व स्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करण्यात व्यग्र असताना त्यांचे वडील, माजी पंतप्रधान व जेडीएसचे नेते एच. डी. देवेगौडा यांनी पद्मनाभनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना या सरकार स्थापनेच्या निमित्ताने सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यामागची भूमिका स्पष्ट केली. देशातील धर्मनिरपेक्ष लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात माझा हा विनम्र प्रयत्न आहे, असे देवेगौडा भावनाविवश होऊन म्हणाले.शपथविधी सोहळ्यासाठी अनेक मुख्यमंत्र्यांची हजेरीकाँग्रेसशी युती करण्यास अनुकूल-प्रतिकूल असणाऱ्या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना मी निमंत्रण दिले आहे. सर्व लोकशाही व धर्मनिरपेक्ष शक्तींनी भाजपाविरोधात एकत्र येण्याचे व्यासपीठ असे या सोहळ््याकडे पाहता येईल. भाजपाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याचा सशक्त संदेश यातून जाईल.- एच. डी. देवेगौडा, जेडीएसचे नेतेराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, बहुजन समाज पार्टीच्या मायावती, आम आदमी पार्टीचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारुख अब्दुल्ला, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (तेलगु देसम), ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक (बिजू जनता दल), पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस), पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंंग, पुडुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन व माजी मुख्यमंत्री ओमन चांडी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव, आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंतो (आसाम गण परिषद), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा, अभिनेते कमल हासन व रजनीकांत इत्यादींना शपथविधी सोहळ्याला निमंत्रित केले आहे. ते येणारही आहेत.काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊ केले होतेनिवडणुकांनंतर काँग्रेसने माझ्याशी संपर्क साधून आघाडी सरकारची कल्पना मांडली, तेव्हा आपण काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊ केले होते. पण काँग्रेसने त्यास नकार दिला आणि कुमारस्वामी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवले, असे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी एका मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले की, मी वा माझा पक्ष सत्तेसाठी हपापलेला नाही. हे आघाडी सरकार पाच वर्षे चालावे, यासाठी आपण प्रयत्नशील राहू. प्रत्येक पक्षाला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद असा प्रस्ताव काँग्रेसने दिलाच नव्हता. आपण निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होऊ इच्छितो. राजकारणातून नव्हे. प्रकृती साथ देईल, तोपर्यंत मी काम करीतच राहीन, असेही देवेगौडा म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खरगे आदी नेते उपस्थित राहतील. सोनिया गांधी हजर राहू शकणार नाहीत, असे समजते.
कर्नाटकी शपथविधीत होणार विरोधी ऐक्याचे शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 1:46 AM