बंगळुरु : कर्नाटकात विधानसभा निवडणुकांत काँग्रेस वा भाजपा यापैकी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज बहुतांशी जनमत चाचण्यांनी व्यक्त केला असला तरी सर्वाधिक जागा काँग्रेसलाच मिळतील, याबाबत सर्व जनमत चाचण्यांचे एकमत दिसत आहे. २२४ मतदारसंघ असून, बहुमतासाठी ११३ जागांवर विजय मिळणे आवश्यक आहे.जनता दल (धर्मनिरपेक्ष) पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याने पुन्हा काँग्रेसचे सरकार बनण्याची शक्यता आहे. एकेक राज्य हातातून निसटत असताना, काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, तर भाजपाने ताकद पणाला लावली आहे.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आतापर्यंत कर्नाटकचे तीन दौरे केले असून, अनेक सभा घेतल्या आहेत. अमित शहा यांनीही बऱ्याच सभा घेतल्या आहेत. या दोघा नेत्यांनी आपल्या भेटीत अनेक मंदिरांत दर्शन घेतले आणि अनेक धर्मगुरूंचे आशीर्वादही घेतले. यंदा लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा सिद्धरामय्या सरकारने दिल्याने वातावरण बदलू शकेल, असे दिसते.जैन-लोकनीती-सीएसडीएसच्या जनमत चाचणीनुसार कर्नाटकात भाजपाला ८९ ते ९५, तर काँग्रेसला ८५ ते ९१ जागा मिळू शकतील. देवेगौडांच्या जनता दलला ३२ ते ३८, तर इतरांना मिळून ६ ते १२ जागा मिळू शकतील. मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक म्हणजे ३0 टक्के लोकांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पसंती दिली आहे. येडियुरप्पांना २५ , तर देवेगौडांचे पुत्र कुमारस्वामी यांना २0 टक्के लोकांनी पसंती दिली. टाइम्स नाऊनुसार काँग्रेसला ९१, भाजपाला ८९ व जनता दलास ४0 जागा मिळू शकतील.इंडिया टुडेच्या जनमत चाचणीनुसार काँग्रेसला ९0 ते ९१, भाजपाला ७६ ते ८६ व जनता दलाला ३४ ते ४३ जागा मिळण्याची शक्यता आहे. सी-फोरच्या निष्कर्षांनुसार मात्र काँग्रेसला स्पष्ट बहुमत म्हणजे १२६ जागांवर विजय मिळेल. भाजपाला ७0 जागी व जनता दलास २७ जागा मिळतील, असा हा सर्व्हे सांगतो. टीव्ही 9-सी व्होटरच्या सर्व्हेनुसार काँग्रेसला १0२ तर भाजपाला ९६ जागा मिळू शकतील. जनता दला २५ जागांवर विजय मिळवू शकेल....तर आम्ही काँग्रेससोबतत्रिशंकू परिस्थितीत आम्ही काँग्रेससोबत जाऊ, असे जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे सर्वेसर्वा व एच. डी. देवेगौडा यांनी स्पष्ट केले आहे. भाजपावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपा सत्तेत असताना राज्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.भाजपाला नाही मित्रराज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास एच. डी. देवेगौडा यांचा जनता दल (धर्मनिरपेक्ष) त्यास पाठिंबा द्यायला तयार आहे. पण कर्नाटकात भाजपाकडे असा मित्रपक्ष नाही. त्यामुळे बहुमतासाठी त्यांना कोणीच मदत करू शकणार नाही, असे दिसत आहे.
सत्ता पुन्हा काँग्रेसच्या हातीच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:30 AM