मुंबई: देशात उष्णतेचा कहर कायम असताना अनेक राज्यांमध्ये कोळसा संकट निर्माण झालं आहे. कोळशाची टंचाई असल्यानं वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. अनेक वीज निर्मिती केंद्रांमधील कोळशाचा साठा संपत आला आहे. या ठिकाणी कोळशाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं ६५७ प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.
कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्यांना सहज मार्ग मिळावा आणि वीज निर्मिती केंद्रांमध्ये वेळेत कोळसा पोहोचावा यासाठी प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्रासह देशातील १३ राज्यांमध्ये वीज संकट आहे. उष्णता वाढल्यानं विजेची मागणी वाढली आहे. त्यातच कोळसा टंचाईचं संकट निर्माण झालं आहे.
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, पंजाब, झारखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानात विजेची कमतरता आहे. त्यामुळे लोडशेडिंग सुरू झालं आहे. ऐन उन्हाळ्यात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. रशियाकडून होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे कोळशापासून निर्माण होणाऱ्या वीजेवरील भार वाढला आहे. सध्या देशातील औष्णिक उर्जा केंद्रांत २१ मिलियन टन कोळसा साठा शिल्लक आहे. हा साठा १० दिवस पुरेसा आहे.