आदमपूर : कारगिल युद्धावेळी पाकिस्तानचे कंबरडे मोडणाऱ्या मिग-29 या लढाऊ विमानाचे अत्याधुनिकीकरण करण्यात आले असून या विमानाची मारक क्षमता वाढली असल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही लढाऊ विमाने रशियाकडून 1980 मध्ये खरेदी करण्यात आली होती. आधुनुकीकरणानंतर हे विमान हवेतच इंधन भरू शकणार आहे. तसेच या विमानामध्ये आधुनिक शस्त्रास्र प्रणाली बसविण्यात आली आहे. या विमानांमुळे चोहीबाजुंनी हल्ला करण्याची क्षमता हवाई दलाला प्राप्त झाली असून लढाऊ विमानांच्या कमतरतेवर काही अंशी मात करता येणार असल्याचे, आदमपूर हवाई विमानतळावरील लेफ्टनंट करण कोहली यांनी सांगितले.
अत्याधुनिक करण्यात आलेल्या विमानामध्ये उभ्या उभ्याच उड्डाण करण्याची क्षमता आहे. भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्यास दुश्मनांच्या विमानाला रोखण्यासाठी केवळ 5 मिनिटांत उड्डाण करण्याची क्षमता या लढाऊ विमानाला मिळालेली आहे. जुन्या विमानामध्ये केवळ बटने होती. आता डिजिटल डिस्प्ले, बहुउपयोगी स्क्रीन आणि काचेची कॉकपिटही देण्यात आली आहे. विमान उड्डाणाची रेंजही वाढली आहे. जुन्या विमानाला काही मर्यादा होत्या. मात्र, आता हवेतून हवेत, जमिनीवर आणि अँटी शिपिंग मोहिमांमध्येही हे विमान महत्वाची भुमिका बजावू शकते. या विमानामध्ये पायलटही त्याची जागा बदलू शकतो.
आदमपूर महत्वाचेआदमपुर विमानतळ खूप महत्वाचा आहे. येथून पाकिस्तानची सीमा 100 किमी आणि चीनची सीमा 250 किमी दूर आहे. आता हवाईतळावर मिग विमानाची तीन स्क्वाड्रन तैनात आहेत. एका स्क्वाड्रनमध्ये 16 ते 18 लढाऊ विमाने असतात.