नवी दिल्ली : २२ आमदारांच्या राजीनाम्यांमुळे अस्थिर असलेल्या मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या कमलनाथ सरकारचे भवितव्य विधानसभेत केव्हा ठरवावे, यावर बुधवारी अपूर्ण राहिलेली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात उद्या गुरुवारी सुरू राहील. ती संपल्यावर लगेच किंवा एक-दोन दिवसांत निकाल लागेल.माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, भाजपचे १० आमदार व काँग्रेसच्या १६ बंडखोर आमदारांनी केलेले अर्ज व दुसरीकडे मध्यप्रदेश काँग्रेसने केलेली याचिका, अशा दोन प्रतिस्पर्धी प्रकरणांवर न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठापुढे घणाघाती युक्तिवाद झाले. कमलनाथ सरकारला विधानसभेत तात्काळ बहुमत सिद्ध करायला सांगावे, यासाठी भाजपची याचिका आहे, तर ‘पळवून डांबून ठेवलेल्या’ आमदारांना मुक्त केल्याशिवाय विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेणे लोकशाहीची हत्या ठरेल, असा काँग्रेसचा प्रतिवाद आहे.भाजप आमदारांच्या वतीने मुकुल रोहटगी, काँग्रेस आमदारांच्या वतीने मनिंदर सिंग यांनी, तर राज्यपालांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला.बंगळुरुमध्ये या आमदारांची भेट घेण्याचा प्रयत्न दिग्विजयसिंह यांनी केला होता. सिंह यांना या आमदारांना पोलिसांनी भेटू दिले नाही. निषेध म्हणून सिंह तेथेच थांबले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. दिग्विजयसिंह व कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन आमदारांची भेट मागितली होती. संपर्क होऊ देत नसल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांच्यावर सिंह यांनी टीका केली.
मध्यप्रदेशात सत्तासंघर्ष; घणाघाती युक्तिवाद, दोन दिवसांत निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 5:55 AM