शक्तिशाली ‘ऑगर’ने आशा वाढविल्या...; २४ मीटरचा ढिगारा हटविण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 10:47 AM2023-11-18T10:47:30+5:302023-11-18T10:47:37+5:30
रात्रभर सुरू असलेल्या ड्रिलिंगनंतर बोगद्यातील ढिगारा २४ मीटरपर्यंत हटविण्यात आला.
उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४० मजुरांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. शक्तिशाली अमेरिकी ऑगर मशिनने शुक्रवारी २४ मीटरचा ढिगारा हटविला आहे. त्यामुळे पाच दिवसांपासून अडकलेल्या मजुरांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होत असल्याचे दिसत आहे.
रात्रभर सुरू असलेल्या ड्रिलिंगनंतर बोगद्यातील ढिगारा २४ मीटरपर्यंत हटविण्यात आला. बोगद्यात ४५ ते ६० मीटर ढिगारा साचला आहे. ढिगाऱ्यामध्ये ड्रिलिंगद्वारे मार्ग तयार करून, ९०० मिमी व्यासाचे सहा मीटर लांबीचे पाइप एकामागून एक टाकले जातील. यातून पर्यायी बोगदा तयार होईल. यातून मजूर बाहेर येतील.
एनएचआयडीसीएलचे संचालक अंशू मनीष खालखो यांनी सांगितले की, मशिन समाधानकारकपणे काम करत आहे. बचाव कार्य अखंडपणे सुरू राहावे, यासाठी आणखी एक ‘ऑगर मशिन’ इंदूरहून विमानाने पाठविण्यात येत आहे. दरम्यान, अडकलेल्या ४० कामगारांमध्ये ज्यांचे नातेवाईक आहेत, त्यांना बोगद्याच्या आत पाइपद्वारे बोलण्याची परवानगी दिली जात आहे.
मदत कार्यात १६५ कर्मचारी
नवयुग अभियांत्रिकी कंपनी लिमिटेडचे पीआरओ जीएल नाथ यांनी सांगितले की, फसलेल्या कामगारांना जेवण देण्यात आले आहे. ते ठीक आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस यासह अनेक एजन्सींमधील १६५ कर्मचारी हे चोवीस तास बचाव कार्य करत आहेत.