नवी दिल्लीः ब्राह्मोस क्षेपणास्त्रांसंबंधीची अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला पुरवत असल्याच्या संशयावरून निशांत अगरवाल नामक हेराला नागपूरच्या एअरोस्पेस सेंटरमधून एटीएसनं सोमवारी अटक केली आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्राची महती जाणून घेतल्यास हे प्रकरण किती गंभीर आहे आणि या माहितीसाठी पाकिस्तान इतका आटापिटा का करतंय, हे सहज लक्षात येईल.
भारत आणि रशियानं एकत्रितपणे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मस्कवा या नद्यांच्या नावांवरून या क्षेपणास्त्राला ब्राह्मोस हे नाव देण्यात आलंय. त्याची अफाट क्षमता पाहिल्यास ते भारताचं ब्रह्मास्त्रच आहे असं म्हणता येईल. ब्राह्मोस हे रडारला चकवा देणारं सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे. ते पाणबुडीतून, जहाजातून, विमानातून किंवा जमिनीवरूनही डागता येऊ शकतं. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया या देशांची नौदलं एजिस कॉम्बॅट सिस्टम ही अद्ययावत यंत्रणा वापरतात. त्यात कॉम्प्युटर आणि रडार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शत्रूच्या शस्त्राचा बिमोड करता येतो. या यंत्रणेला टक्कर देण्याची ताकद ब्राह्मोसमध्ये आहे.
ब्राह्मोस लाँच झालं तेव्हा या क्षेपणास्त्राइतकं सक्षम अँटी शिप क्रूझ मिसाईल अमेरिकेकडेही नव्हतं. हिंदी महासागरात शत्रूच्या जहाजांपासून संरक्षणात ब्राह्मोस महत्त्वपूर्ण भूमिका बजावतंय. नेमकी हीच ताकद पाकिस्तान आणि चीनला खुपतेय. हिंदी महासागरात घुसखोरीचे प्रयत्न भारताचे हे दोन शेजारी करताहेत. परंतु, ब्राह्मोसमुळे त्यांचे मनसुबे उधळले जाताहेत. अण्वस्त्रसज्ज बंकर, कमांड अँड कंट्रोल सेंटर्स आणि समुद्रावर उडणारी विमानं यांना ब्राह्मोस दुरूनच लक्ष्य करतं.
ब्राह्मोसपेक्षा सरस CM-302 नावाचं क्षेपणास्त्र चीन विकसित करतंय. स्वाभाविकच, पाकिस्तानला त्याच्यात रस आहे. पण, इकडे भारताने 'ब्राह्मोस-II'ची तयारी सुरू केलीय. आवाजाच्या वेगापेक्षा सात पट वेगानं मारा करण्याची त्याची क्षमता असेल. सुखोई-३० एमकेआय फायटर जेटमधून ब्राह्मोस मारा करू शकतं. सुखोई-ब्राह्मोसची ही 'युती' म्हणजे 'डेडली कॉम्बिनेशन'च मानलं जातं. २९० किलोमीटर अंतरापर्यंतच लक्ष्य ब्राह्मोस भेदू शकतं. तसंच, ३०० किलो युद्धसामग्री वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.
स्वाभाविकच, या क्षेपणास्त्राबद्दलच्या बारीकसारीक गोष्टी पाकिस्तानला जाणून घ्यायच्यात. त्यामुळे डीआरडीओमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न आयएसआय करत असते. गेल्या काही वर्षात काही मंडळी त्यांच्या गळाला लागली, पण या हेरांना अचूक हेरत सुरक्षा यंत्रणांनी त्यांना हिसका दाखवला आहे. या यादीत आता निशांत अगरवालचं नावही जोडलं गेलंय.
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्तपणे कारवाई करत ब्राह्मोस एअरोस्पेस सेंटरजवळूनच निशांतला अटक केली. तो DRDO च्या बुटीबोरी युनिट मध्ये कार्यरत होता. अलीकडेच त्याला संरक्षण सचिव (संशोधन आणि विकास) आणि DRDOच्या अध्यक्षांच्या हस्ते पुरस्कारही मिळाला होता. परंतु, ब्राह्मोसबाबतची गोपनीय माहिती तो अमेरिका आणि पाकिस्तानला पुरवत असल्याची पुरावे एटीएसला सापडले आणि पोलिसांनी त्याला जेरबंद केलं.