- असिफ कुरणे
भोपाळ : विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताविरोधी वातावरणासह पक्षांतर्गत बंडाळीचा सामना भाजपला करावा लागत आहे, तर काँग्रेसलादेखील काही प्रमाणात बंडखोरांचा त्रास होत आहे. २३० जागांपैकी ५० जागांवर बंडखोरांमुळे बहुरंगी लढती होत असून, या लढतीच सत्तेची गणिते जमविणार किंवा बिघडविणार आहेत. सर्वांत जास्त अडचणी भाजपसमोर असून, भाजप नेत्यांनीच पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.मध्य प्रदेशमधील जवळपास ६२ मतदारसंघांत बंडखोरांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे तेथे बहुरंगी लढती होत आहेत. दोन खासदार, दोन माजी मंत्री आणि डझनभर आमदार, नातेवाइकांनी बंडखोरी करीत अधिकृत उमेदवारांना घाम फोडला आहे. यातील अनेकांचे स्वत:च्या मतदारसंघात मोठे वर्चस्व असून, ते निकाल फिरविण्याची क्षमता ठेवतात.बंडखोरीला आळा घालण्यासाठी भाजपने आपल्या ६४ नेत्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. असे असले तरी अनेक नेते अजूनही मैदानात आहेत. भाजपाकडून चारवेळा खासदार राहिलेले माजी मंत्री रामकृष्ण कुसमरिया यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पक्षाविरोधात शड्डू ठोकला आहे. ते पक्षाच्या स्टार प्रचारकही होते. आता ते पक्षविरोधी प्रचार करतील. दमोह, पथरिया या दोन मतदारसंघांतून ते उमेदवार आहेत. दमोहमधून तर त्यांनी राज्याचे अर्थमंत्री जयंत मलैया यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. ग्वालियरचे माजी महापौर आणि मंत्री समीक्षा गुप्ता यांनीदेखील पक्षाच्या अनेक विनवण्यानंतरदेखील उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. माजी आमदार जितेंद्र दागा, राघवजी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पण, आपल्या भागातून भाजप उमेदवार विजयी होणार नाही असे आव्हान त्यांनी दिले आहे.काँग्रेसलादेखील बंडखोरांच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहेत; पण पक्षाने अनेक ठिकाणी बंडखोरांचे मन वळविण्यात यश मिळविले आहे. असे असले तरी पक्षातील बंडखोर नेत्यांनी उज्जैन उत्तर, दक्षिण, झाबुआ, बालाघाट, महिदपूर येथे काँग्रेस उमेदवारांना अडचणीत आणले आहे.काँग्रेसचे माजी आमदार झेविअरमेढा यांना पक्षातून बडतर्फकरण्यात आले आहे. तरी ते रिंगणात कायम आहेत.भाजपाच्या ३० जागा धोक्यातबंडखोरीचा सर्वाधिक फटका भाजपला सहन करावा लागेल. बंडखोरांमध्ये विद्यमान आमदार, आरएसएस स्वयंसेवक, प्रमुख नेत्यांचा समावेश असल्यामुळे अधिकृत उमेदवारांना घाम फुटला आहे. बंडखोरांसोबत मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे भाजपश्रेष्ठींनी धसका घेतला आहे.मतदारसंघ प्रमुख बंडखोरदमोह , पथरिया - रामकृष्ण कुसमरिया (भाजप बंडखोर, अपक्ष)हौशंगाबाद - सरताजसिंह (भाजप बंडखोर, काँग्रेसमधून उमेदवार)ग्वाल्हेर दक्षिण - समीक्षा गुप्ता (भाजप बंडखोर, अपक्ष)बरेसिया - ब्रह्मानंद रत्नाकर (भाजप बंडखोर, अपक्ष)भिंड - नरेंद्रसिंग कुशवाहमहेश्वर - राजकुमार मेव (भाजप बंडखोर)जबलपूर - धीरज पटेरिया (भाजप बंडखोर)उज्जैन उत्तर - माया त्रिवेदी (काँग्रेस बंडखोर, अपक्ष)झाबुआ - झेविअर मेढा (काँग्रेस बंडखोर, अपक्ष)बडवानी - राजन मंडलोई (काँग्रेस बंडखोर, अपक्ष)