नवी दिल्ली-
स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन देशाच्या पंतप्रधानांनी देशाला संबोधित करण्याची प्रथा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं देशवासियांना संबोधित करताना आपल्या १ तास २३ मिनिटांच्या भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. देशाचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम म्हटलं की कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. लाल किल्ल्याला आजच्या दिवशी सुरक्षा तटबंदीचच रुप प्राप्त होतं. लाल किल्ल्यावर ज्या ठिकाणाहून पंतप्रधान देशाला संबोधित करतात त्याला बुलेट प्रूफ काचांनी बंदिस्त केलं जात होतं. पण नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होताच त्यांनी ही प्रथा मोडीत काढली.
पंतप्रधान मोदींनी खुल्या व्यासपीठावर भाषण करणं पसंत केलं. असं असलं तरी देशाच्या पंतप्रधानांची सुरक्षा प्रत्येक देशासाठी प्राधान्य असतं. त्यात सध्याच्या लेटेस्ट तंत्रज्ञानात ड्रोन हल्ल्यांचं प्रमाणही लक्षणीयरित्या वाढलं आहे. त्यामुळे ड्रोननं होणारे हल्ले रोखण्यासाठी भारतीय लष्कराला सज्ज राहावं लागतं.
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात शेकडो लष्करी जवान, शाळेचे विद्यार्थी आणि व्हीआयपी व्यक्ती उपस्थित होते. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देशाच्या सैन्य दलांवर असते. लाल किल्ल्याजवळ स्वदेशी अँडी ड्रोन सिस्टम देखील तैनात करण्यात आला होता. याचा व्हिडिओ समोर आला आहे. याला काऊंटर ड्रोन सिस्टम म्हटलं जातं.
ड्रोन सिस्टमची निर्मिती भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं (DRDO) केली आहे. हे तंत्रज्ञान दोन पद्धतीवर काम करतं. पहिलं सॉफ्ट किलच्या माध्यमातून कोणत्याही संशयित ड्रोनच्या संचार लिंकला नष्ट करणं. म्हणजेच ड्रोन ज्या कोणत्या रिमोट कॉम्युटरच्या सहाय्यानं ऑपरेट केला जात आहे त्याच्याशी संपर्क तोडणं. यामुळे ड्रोन दिहाहिन होऊन खाली पाडला जातो. ऑपरेटरशी कोणताही संपर्क न राहिल्यानं ड्रोन काहीच उपयोगाचा ठरत नाही.
दुसरं म्हणजे हार्ड किल यात संशयित ड्रोन सिस्टमच्या रेंजमध्ये येताच त्यावर लेझर शस्त्रानं हल्ला केला जातो आणि ते हवेतच नष्ट केलं जातं. कोणत्याही आवाजाविना आणि स्फोटाविना ड्रोन नष्ट करता येतो. अँटी ड्रोन सिस्टमची रेंज चार किलोमीटर इतकी आहे. याचा अर्थ असा की शत्रूचा ड्रोन या रेंजमध्ये आला की निकामी केला जातो किंवा तो नष्ट केला जातो.