नवी दिल्ली : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे, तसेच लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण, प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्यासह महाराष्ट्रातील चार पद्म पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्हील चेअरवर आलेल्या सुलोचना चव्हाण यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद व्यासपीठाच्या खाली उतरून पद्म पुरस्काराने सन्मानित केले. राष्ट्रपती कोविंद यांच्या या कृतीनंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वार्धक्यामुळे सुलोचना चव्हाण यांना व्हील चेअरवर आणण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद व्यासपीठाच्या खाली उतरले. त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य दिवंगत डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांच्या पत्नी श्रीमती वीणा तांबे यांनी स्वीकारला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.