सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये १९ वर्षांचा मुलगा रात्री उशिरा धावताना दिसत आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मुलाचे नाव प्रदीप मेहरा (Pradeep Mehra) असं आहे. तसंच तो मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. आर्थिक संकटामुळे प्रदीप नोएडा येथील मॅकडोनाल्डमध्ये काम करतो. त्याची इच्छा सैन्यात भरती होण्याची आहे.
प्रदीपने मंगळवारी गौतम बुद्ध नगरचे जिल्हाधिकारी सुहास एल यथीराज यांची भेट घेतली. यावेळी त्यानं जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्या आर्थिक परिस्थिती आणि भविष्याबद्दल सांगितलं. नवभारत टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. प्रदीप बारावी उत्तीर्ण आहे. मात्र, त्यांनी अद्याप पदवीसाठी प्रवेश घेतलेला नाही. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचं पुढील शिक्षण आणि करिअर कौन्सिलिंग करण्याविषयी सांगितलं. तसंच त्यांच्याकडून आईच्या उपचाराबाबत अहवाल मागवला आहे. जेणेकरून त्यांच्यावर जिल्ह्यात उपचार करता येतील.
"मी आज नोएडाच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी माझ्या आईच्या उपचारासाठी मदत करणार असल्याचं सांगितलं. सोबत लष्करात भरती होण्यासाठी चांगलं प्रशिक्षण घेण्यातही ते मदत करणार आहेत. सध्या मी माझं काम सुरू ठेवावं असंही त्यांनी सांगितलं," असं प्रदीपनं त्यांच्या भेटीनंतर सांगितलं.
काय आहे व्हायरल व्हिडीओत?व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा रात्री उशिरा घराकडे धावत जात असल्याचं दिसत आहे. याच दरम्यान, विनोद कापरी हे त्याला आपल्या गाडीतून घरी सोडण्यीच ऑफर देतात. परंतु ते तो नाकारतो. त्यानंतर तो आपण मॅकडोनाल्डमध्ये काम करत असून शिफ्ट संपल्यानंतर घरी जात असल्याचंही सांगतो. आपलं नाव प्रदीप असल्याचं सांगतो उत्तराखंडच्या अल्मोडा येथील रहिवासी असल्याचंही त्यानं सांगितलं. तसंच आपण लष्करात जाण्यासाठी तयारी करत असून धावण्याचा सराव करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे सवय होण्यासाठी शिफ्ट संपवून घरी जाताना धावत घरी जात असल्याचंही तो सांगताना दिसत आहे.