Pradeep Nain Army : भारतमातेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या जवानाने अखेर अंतिम श्वास घेऊन या जगाचा निरोप घेतला. हरयाणातीलशहीद जवान प्रदीप नैन हे त्यांच्या बाळाचा चेहरा न पाहताच आपल्यातून निघून गेले. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्यामध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला. २७ वर्षीय शहीद प्रदीप यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या गावात एकच खळबळ माजली. दोन दिवस गावातील एकाही घरात चूल पेटली नाही. जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत प्रदीप नैन यांना वीरमरण आले आणि त्यांच्या आई वडिलांनी एकुलत्या एक मुलाला गमावले. प्रदीप यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी जिंद जिल्ह्यातील जजनवाला गावात स्थानिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. प्रदीप नैन हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. या शहीद जवानाला सोमवारी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. प्रदीप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लष्कराचे अधिकारी, माजी अधिकारी, सैनिक आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. घटनास्थळी आर्मी वेटरन असोसिएशनचे झोनल अध्यक्ष राजबीर सिंह म्हणाले की, शहीद होण्यापूर्वी प्रदीप यांनी पाच दहशतवाद्यांना मारले होते.
तसेच पॅरा कमांडो लान्स नाईक प्रदीप नैन हे जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व करत होते. गोळी लागल्याने प्रदीप यांना वीरमरण आले, असेही राजबीर सिंह यांनी सांगितले. आजूबाजूच्या गावातील लोक आणि सर्व गावकरी प्रदीप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. यावेळी स्थानिक प्रशासन घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान, प्रदीप जैन यांची अंत्ययात्रा सुरू असताना त्यांची गर्भवती पत्नी मनीषा नैन पतीच्या अंत्ययात्रेत मागे चालत होती. पत्नी मनीषा नैन पायी चालत घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमीच्या परिसरापर्यंत पोहोचली. शहीद पतीचा आत्मा दुखावेल म्हणूनच मी अश्रूंचा बांध रोखला असल्याचे मनीषा यांनी सांगितले.