जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. शनिवारी दहशतवाद्यांशी लढताना दोन जवान शहीद झाल्यानंतर रविवारी झालेल्या चकमकीत जवानांनी 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला. याच दरम्यान कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी लढताना लष्कराचे कमांडो प्रदीप नैन शहीद झाले. ते जींदचे रहिवासी होते आणि दहशतवाद्यांशी धैर्याने लढत होते.
प्रदीप २०१५ मध्ये लष्करात कमांडो म्हणून रुजू झाले आणि दोन वर्षांपूर्वी (२०२२) त्यांचं लग्न झालं. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या प्रदीप यांचं पार्थिव आज गावात आणण्यात येणार आहे. प्रदीप यांच्या कुटुंबात त्यांचे आई-वडील आणि पत्नी यांचा समावेश आहे. प्रदीप हे त्यांच्या आई-वडिलांचे एकुलता एक पुत्र होते.
प्रदीप यांची पत्नी गरोदर असून पती शहीद झाल्याची माहिती मिळताच तिची प्रकृती खालावली. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संपूर्ण गावात शोकाकूल वातावरण आहे कारण वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिले आहे. प्रदीप यांच्या शेजारील गावातील रहिवासी सेवानिवृत्त सुभेदार जय भगवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप हे अतिशय साध्या स्वभावाचे होते.
सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी पहिली चकमक मोदरगाम गावात झाली, जिथे पॅरा कमांडो लान्स नाईक प्रदीप नैन हे कारवाईत शहीद झाले. यानंतर सुरक्षा दलांनी गुप्तचर माहितीच्या आधारे ऑपरेशन सुरू केले आणि तीन दहशतवाद्यांना त्यांच्या लपलेल्या ठिकाणी घेरले. दुसरी चकमक फ्रिसल चिनिगाम गावात झाली, जेव्हा सुरक्षा दलांना या भागात दहशतवाद्यांची माहिती मिळाली.