नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी ४७ ख्यातनाम, नामवंत व्यक्तींना येथे एका कार्यक्रमात पद्म पुरस्कार प्रदान केले. यात नाट्यकलावंत वामन केंद्रे, गायक शंकर महादेवन आणि मेळघाटात आरोग्य सेवा देणारे डॉ. रवींद्र कोल्हे यांचा समावेश आहे.ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मोहनलाल, माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, अकाली दलाचे नेते सुखदेवसिंह धिंडसा आणि प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नायर (मरणोत्तर) यांचा पुरस्कार प्रदान झालेल्यांत समावेश आहे. बिहारचे नेते हुकूमदेव नारायण यादव (पद्मभूषण), बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी सिस्को सिस्टीम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चेंबर्स (पद्मभूषण) आणि प्रसिद्ध नर्तक प्रभू देवा (पद्मश्री) यांना राष्ट्रपती भवनमध्ये झालेल्या विशेष समारंभात या पुरस्काराने सन्मानित केले गेले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.विश्वनाथन मोहनलाल, धिंडसा आणि नायर (मरणोत्तर) यांना पद्मभूषणने, तर जयशंकर यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. कुलदीप नायर यांच्या पत्नीने पुरस्कार स्वीकारला. इतर मान्यवरांत गायक शंकर महादेवन नारायण (पद्मश्री), लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा (पद्मभूषण), डॉक्टर संदीप गुलेरिया आणि इल्यास अली (दोघेही पद्मश्री) आणि कुस्तीगीर बजरंग पुनिया (पद्मश्री) यांचा समावेश होता.पुरस्कार मेळघाटवासीयांना समर्पित : डॉ. कोल्हेगेल्या ३४ वर्षांमध्ये अनेकांनी मदत केली. त्यांच्या मदतीशिवाय बैरागड उभारणे शक्य नव्हते. अत्यंत कठिण प्रसंगी आमचा हात न सोडणाऱ्या मेळघाटवासियांना पद्मश्री पुरस्कार समर्पित असल्याची भावना डॉ. रविंद्र व स्मिता कोल्हे यांनी व्यक्त केली.नाट्यकलाकारांनी आकर्षणात अडकू नये : प्रा. केंद्रेनाट्यकलाकारांनी छोट्या-मोठ्या पडद्याच्या आकर्षणात अडकू नये. आपले मूळ विसरू नये. कलाप्रांताशी इमान राखावे. आपल्या कारकिर्दीची विभागणी केली तर नाट्यकलाकार कलेच्या सर्व ‘फॉर्म’मध्ये यशस्वी होतो, असा कानमंत्र प्रा. वामन केंद्रे यांनी कलाकारांना दिला.
राष्ट्रपतींच्या हस्ते ४७ जणांचा पद्म पुरस्काराने गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 6:29 AM