गुरूग्राम- रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या प्रद्युम्न हत्या प्रकरणात दररोज धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रद्युम्नचा हत्ये प्रकरणात अटक केलेल्या स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमार याला जामीन देण्यात आला. अशोक कुमारला जामीन मिळाल्यानंतर आता सीबीआयने विशेष तपास पथकात (SIT) असलेल्या पोलिसांचे बँक अकाऊंट्स आणि कॉल रेकॉर्ड तपासण्याचा निर्णय घेतला आहे. प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणात पोलिसांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर आता सीबीआयने या पोलिसांची बँक खाती आणि कॉल रेकॉर्ड्स तपासण्याचा निर्णय घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
विशेष तपास पथकाने प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येप्रकरणी बस कंडक्टर अशोक कुमारला दोषी ठरवत 8 सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर सीबीआयने 8 नोव्हेंबरला हत्येप्रकरणी रायन इंटरनॅशनलच्या अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं. विशेष तपास पथकाच्या तपासात काही त्रुटी राहिल्या आहेत, असंही सीबीआयने म्हंटलं आहे. त्याचमुळे आता सीबीआयने एसआयटीमधील पोलिसांची बँक खाती तपासण्याचा निर्णय घेतला आहे. अकरावीत शिकणाऱ्या या मुलाने परीक्षा आणि पालकसभा टाळण्यासाठी प्रद्युम्नची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुार, लवकरच सीबीआयकडून एसआयटीतील सदस्यांना नोटीस जारी करून त्यांच्या सुट्ट्या व शहराबाहेर जायला बंदी केली जाऊ शकते.
प्रद्युम्नच्या हत्ये प्रकरणी ज्या प्रकारे स्कूल बस कंडक्टर अशोक कुमारला अटक करून त्याला जबरदस्तीने गुन्हा कबूल करायला लावला. हत्येसाठी वापरलेला चाकू ठेवायची बाब समोर आली, सीसीटीव्ही फूटेज आणि साक्षीदारांचे कॉल रेकॉर्ड दुर्लक्षित केले गेले, यातून पोलीस तपासात त्रुटी राहील्याचा संशय येतो आहे. पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा का केला ? याचा तपास करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं, सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.