गुरूग्राम- गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील चर्चित प्रद्युम्न हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या बस कंडक्टरला मंगळवारी जामीन मंजूर करण्यात आला. सोमवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. जिल्हा न्यायालयाने बस कंडक्टर अशोकला 50 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला. 8 सप्टेंबरपासून तुरूंगात असलेला कंडक्टर अशोक कुमार बुधवारी तुरूंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.
22 सप्टेंबर रोजी प्रद्युम्न हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सीबीआयकडे सुपूर्त करण्यात आला. स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमार याच्या विरोधात कुठलेही पुरावे न मिळाल्याने त्याला 50 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. गुरगावातील घमरोज या गावात अशोक कुमार त्याच्या कुटुंबासह राहतो. अशोकला 50 हजार रूपये जमा करायला त्याच्या गावातील लोकांनी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
'अशोकला अटक झाल्यापासून आम्ही सगळ्यांनी पैसे जमा करायला सुरूवात केली. गावातील प्रत्येक व्यक्ती अशोकला मदत करत असून प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने पैसे देत आहे. काही जण 100 आणि 500 तर काही जण 1000 आणि 2000 रूपयांची मदत करत आहेत. आम्ही आत्तापर्यंत अशोकसाठी दोन लाख रूपये जमा केले असल्याचं स्थानिक रहिवासी रजिंदर यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं. अशोक निर्दोष असल्याचं आम्हाला माहिती आहे म्हणूनच त्याला मदत करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
अशोकच्या बॅक खात्यात सप्टेंबर महिन्यात सात हजार रूपये पगार जमा झाला होता. त्यानंतर रायन इंटरनॅशनल स्कूलने अशोकचा पगार बंद केला. घरखर्च, रेशन आणि मुलांच्या शाळेची फी देण्यासाठी गावातील लोकांनी आम्हाला मदत केली. जेव्हाही पैशांची गरज भासली तेव्हा गावातील लोक मदतीसाठी पुढे आली, असं अशोक कुमार यांची आई केला देवी यांनी सांगितलं.