नवी दिल्ली, दि. 11- गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या सात वर्षीय प्रद्युम्नच्या हत्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि हरयाणा सरकारला नोटीस बजावली असून, तीन आठवडयांच्या आत अहवाल मागवला आहे. पीडीतांच्या वकिलाने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
प्रद्युम्नच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत शाळा व्यवस्थापनेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. रायन इंटरनॅशनलचे रिजनल हेड आणि एचआर हेड यांना अटक करण्यात आली असून त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणात सोहना पोलीस ठाण्याच्या एसएचओंना निलंबित करण्यात आलं आहे. रायन इंटरनॅशनल शाळा मंगळवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
तपासात अनेक त्रुटी
मुलाच्या हत्येला दोन दिवस झाले पण अजूनही खरं काय आहे ते समोर आलं नाही. हत्या का झाली यामागील सत्य समोर यावं, हीच माझी इच्छा आहे. स्थानिक पोलीस करत असलेल्या तपासातून काही गोष्टी सुटल्या आहेत. म्हणूनच या घटनेची सीबीआय चौकशी व्हायला हवी. स्थानिक पोलीस करत असलेल्या तपासावर मी समाधानी नसून मुलाच्या हत्येप्रकरणाचा सविस्तर तपास हवा आहे. स्थानिक पोलीस करत असलेल्या तपासात अनेक त्रुटी आहे. म्हणूनच सीबीआयने तपास करायला हवा, असं प्रद्युम्नच्या वडिलांनी म्हंटलं आहे.
प्रद्युम्नच्या आईचा आत्महत्येचा इशारारायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये हत्या झालेल्या प्रद्युम्न ठाकूरच्या आईने आत्महत्येचा इशारा दिला आहे. प्रद्युम्नच्या खऱ्या मारेकऱ्यांना पकडलं नाही, तर आत्महत्या करेन, असा इशारा प्राम्नच्या आईने दिला आहे. तर प्रद्युम्नचे वडील या प्रकरणाची दाद सुप्रीम कोर्टात मागणार आहेत.
शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी प्रद्युम्नचा मृतदेह शाळेच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला होता. या प्रकरणी शाळेच्या बस कंडक्टर अटक करण्यात आली आहे. पण या हत्येमागे कंडक्टर नसावा, कोणी अन्य यामागे आहे, असा आरोप प्रद्युम्नच्या आईने केला आहे. पोलीस कोणाला तरी वाचवण्यासा प्रयत्न करत आहेत. खरा आरोपी पकडला न गेल्यास आत्मदहनाचा इशारा प्रद्युम्नच्या आईने दिला आहे. आरोपी बसवाहक अशोक असं कृत्य करूच शकत नाही, अशी माहिती चालकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली आहे. त्याच्याकडे चाकूही नव्हता, असं चालकाचं म्हणणं आहे.