Parliament Session : आज संसदेच्या विशेष अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या चर्चेदरम्यान राज्यसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel), आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांच्यावर संतापले. 'संजय भैया, तुम्ही इथे बसून त्यांची (काँग्रेस) आणि आमची बदनामी करत आहात', अशी टीका पटेल यांनी केली.
नेमकं काय झालं?राज्यसभेत बोलताना संजय सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे नाव घेतले होते. 'एकाही भ्रष्टाला सोडणार नाही, अशी पंतप्रधान मोदींची हमी होती. पण, बारकाईने पाहिल्यावर असे दिसते की, सर्व भ्रष्टाचारी भाजपमध्ये सामील होत आहेत. हीच पंतप्रधानांची हमी आहे. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यातील आरोपी छगन भुजबळ भाजपसोबत आले आहेत,' अशी बोचरी टीका संजय सिंह यांनी केली होती.
प्रफुल्ल पटेलांचा पलटवारसंजय सिंह यांच्या टीकेला उत्तर देताना प्रफुल्ल पटेलांन यूपीए सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झालाय असे वाटत असेल, तर तुम्ही त्यांच्यासोबत(काँग्रेस) का बसला आहात. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. अण्णा हजारे यांचे नाव न घेता प्रफुल्ल पटेल म्हणाले की, तुम्ही आमच्या राज्यातील एका वृद्धाला सोबत घेऊन आमच्या नेत्यांची बदनामी केली, तेव्हा आम्हीही यूपीए सरकारमध्ये होतो. तुम्हीच इंडिया अगेन्स्ट करप्शन सुरू केले होते, आता तुम्हीच त्यांना क्लीन चिट दिली? असा सवाल पटेलांनी केला.